पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

लोकांना या शहाणे म्हणविणाऱ्या मंडळींनी का करू नये ? लोकात धर्मबुद्धी जागृत करून आमच्या राष्ट्रीयत्वास बळकटी का आणू नये ? आमची धर्मबुद्धी जागृत ठेवण्याचे काम जर शिकलेल्या मंडळींच्या हातून पार पडत नाही तर ही सुशिक्षित मंडळी निष्कारण जिवंत राहिली असेच म्हणावे लागते." यातील भावार्थ हाच आहे की जुन्या धर्माला काळास योग्य असे रूप देऊन धर्म ही महाशक्ती आपण जिवंत ठेविली पाहिजे. राष्ट्र, लोकसत्ता, समाजवाद, मानवता, या निष्ठा आपापल्याला परीने अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्याहि मोठ्या शक्ती आहेत. पण वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या शक्तीशी त्यांची तुलना होणार नाही. धर्मभक्ति ही मानवाच्या रोमारोमात जाऊन भिनलेली आहे. आणि जगात जोपर्यंत अन्याय, अत्याचार, विषमता या मानवी आपत्ती व रोगांच्या साथी, अवर्षण, महापूर, भूकंप आणि मृत्यू या नैसर्गिक आपत्ती आहेत तोपर्यंत तरी या सर्वांतून मुक्त करणाऱ्या शक्तीची उपासना मानव करीत राहणारच. शिवाय मानवी मनाला आत्मार्पणाची, सर्वस्वदानाची एक फार प्रबळ आस असते. तिची तृप्ति धर्मभावनेवाचून कधीच होणार नाही. याहीपलीकडे एक गोष्ट आहे. मानवाला अमरत्वाची, अनंतत्वाची मृत्युंजयत्वाची अत्यंत उत्कट अशी आर्ति असते. आणि प्रत्येक धर्मात जन्ममरणातीत, दिक्कालातीत, अव्यय, अविनाशी अशा ईशरूपाचे वर्णन केलेले असते ते यासाठीच. मानवी जीवनाला जी प्रफुल्लता, जे सौंदर्य, जी माधुरी आलेली असते ती धर्माने दिलेल्या या त्रिविध तृप्तीमुळेच होय. तिच्या अभावी या जीवनाला स्मशानकळा आल्याखेरीज राहणार नाही. ती अवकळा सध्या आपल्या देशाला येऊ पहात आहे. कारण आपण निधर्मी झालो आहो.
 ही घोर आपत्ति टाळावयाची असेल तर वैयक्तिक पुण्य एवढाच जो धर्माचा संकुचित अर्थ येथे रूढ झाला आहे तो सोडून थोर सामाजिक पुण्य असा विशाल अर्थ आपण त्याला प्राप्त करून दिला पाहिजे. आज या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरहि पूर्वीप्रमाणेच अन्याय, अत्याचार, जुलूम हे चालू आहेत. त्यांचा प्रतिकार करणे हे धर्मसंघटनांचे कार्य आहे हे नव्या धर्मवेत्त्यांनी जाणले तरच तरुण मने धर्माकडे आकृष्ट होतील व धर्म ही महाशक्ती जिवंत होईल. अन्यायाचा प्रतिकार येथे काहीसा चालू आहे पण तो पक्षीय दृष्टीने केला