पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

होते. औका उलटले तर ? मृत्यु निश्चित होता. तरीहि कार्यावरची त्यांची निष्ठ चळली नाही. एक दिवस आपापल्या तरुण स्त्रियांचा निरोप घेऊन हे पाचहि वीर पुरुष जीजस् ची प्रार्थना मुखाने गात तिकडे निघाले. आणि तीच त्यांची शेवटची भेट ठरली. कारण त्या सर्वांचा औकांनी क्रूरपणे संध्याकाळच्या आतच वध करून टाकला. मठात ही बातमी पोचली तेव्हा एकच हाहाकार झाला. पण या स्त्रियांनी परमेश्वराला दोष दिला नाही. उलट, आम्हालाहि असेच मरण येऊ दे म्हणून प्रार्थना केली. अमेरिकेत ही बातमी पोचताच एक हजार तरुण लोकांनी औका जमातीत जाऊन राहण्यासाठी नावे नोंदविली !
 भारतात ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित होऊन पाश्चात्त्य विद्येचा प्रसार होऊ लागला तसतसा धर्माचा सामाजिक अर्थ आम्हाला प्रतीत होऊ लागला. आणि ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, रामकृष्ण मठ या धर्मसंघटना हिंदुस्थानात निर्माण झाल्या. गेल्या शंभर वर्षात त्यांनी समाजाचे परिवर्तन घडविण्यात फार मोठे कार्य केले यात शंकाच नाही. शब्दप्रामाण्य जाऊन बुद्धिप्रामाण्य आले आणि विज्ञानाचा प्रसार होऊन जुन्या श्रद्धा ढासळून गेल्या. त्यावेळी धर्माचे पुनरुज्जीवन करून या संस्थांनी तरुण मनाला पुन्हा धर्माकडे आकृष्ट करून घेण्यात मोठेच यश मिळविले. पण भारताचा एकंदर विस्तार आणि त्याच्यापुढच्या समस्या पाहिल्या तर प्रयत्न अगदीच थिटे पडतात असे दिसते. हिंदुत्ववादी संघटनांचा विचार केला तर असे दिसते की अजूनहि पाश्चात्त्य मिशनरी येथले गिरिवासी, वनवासी, अस्पृश्य, दलित, यांच्यात मिसळून जे कार्य करीत आहेत त्याच्या शतांशही आपल्या हातून होत नाही. हिंदुस्थानाबाहेर तर नाहीच पण हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन जेथे जेथे रानटी जमाती राहत आहेत तेथपर्यंत धर्म व संस्कृतीचा संदेश पोचविण्याचे कार्य करील अशी एकहि धर्मसंघटना भारतात नाही. आज भारतात सरकारने देशाच्या उत्कर्षासाठी किती तरी योजना आखल्या आहेत. पण सरकारी अहवालावरून असे दिसते की ही कामे सर्व भाडोत्री लोकांच्या हाती आहेत. 'मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया' अशी त्यांची स्थिति आहे. अशा वेळी क्वेकर, मेथॉडिस्ट अशांसारख्या धर्मसंघटना स्थापन होऊन किंवा आर्यसमाज, रामकृष्ण मठ, प्रार्थनासमाज या जुन्याच संस्थांनी याकडे लक्ष वळवून या योजनातून जेथे भ्रष्टता, अन्याय,