पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
वैयक्तिक व सामाजिक

या संघटनेत सामील होत आहेत. आज या संस्थेचे ४००० तरुण मिशनरी निरनिराळ्या २५ देशांतील जमातीत काम करीत आहेत. त्यांत शेकडो तरुण विद्यार्थिनी पण आहेत. मारिआना स्लोकम या मुलीच्या प्रियकराला त्यांच्या विवाहाच्या आदल्या दिवशीच दुर्दैवाने मृत्यू आला. पण तिने घेतलेले व्रत सोडले नाही. ती तशीच चिआपास प्रदेशातील झेलताल या जमातीत जाऊन १६ वर्षे राहिली आणि शाळा स्थापून, पुस्तके लिहून तिने ५००० झेलताल लोकांना ख्रिस्ती धर्मात आणले, आणि पाश्चात्त्य जगातल्या सर्व अर्वाचीन सुधारणा त्यांच्यात रूढ केल्या. तेथले काम संपल्यावर १९५७ च्या डिसेंबरात ती दुसऱ्या जमातीत रहावयास गेली. मारिआनासारख्या शेकडो कॉलेज- विद्यार्थिनी दक्षिण अमेरिकेच्या गहन अरण्यात आज ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य तनमनधन अर्पून करीत आहेत.
 अशा या धर्म-प्रसाराच्या प्रयत्नातच जानेवारी १९५६ मध्ये इक्वोडॉरच्या जंगलात पाच प्रोटेस्टंट तरुणानी जीजस् च्या कार्यासाठी आत्मबलिदान केल्याची रोमहर्षक घटना घडली. या इक्वेडोरच्या जंगलात मिशनऱ्यांचे अनेक मठ आहेत. अनेक जमातीत त्यांचे कार्य चालू आहे. औका इंडियन ही जमात अजून तशीच राहिलेली आहे. हे औका अत्यंत क्रूर व हिंस्र आहेत. परका माणूस दृष्टीस पडताच ते विषारी बाणांनी त्याला ठार मारतात, त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचे धाडस कोणाला होत नव्हते. पण नॅथनल सेंट, जिम इलियट, पीटर फ्लेमिंग, एड मॅककुली इ. तरुणांनी हे आव्हान स्वीकारावयाचे ठरविले. हे सर्व विद्यापीठातले तरुण होते. एक वैमानिक होता. एक कुस्तीगीर होता. एक फुटबॉल खेळाडू होता. अत्यंत बुद्धिमान म्हणून कॉलेजात त्याची कीर्ती होती. त्यांनी या कार्यासाठी आत्मार्पण करावयाचे ठरविले. जीजस् चा धर्म पोचला नाही अशी एकादी जमात पृथ्वीवर असू शकते याची त्यांना नामुष्की वाटू लागली. या सर्वांची लग्ने झाली होती. आपल्या तरुण स्त्रियांना बरोबर घेऊन ते इक्वेडोर जंगलात एका मिशनरी मठात येऊन राहिले. हळूहळू विमानातून टेहेळणी करून त्यांनी औका जमातीचा निवास शोधून काढला. त्यांच्याशी थोडी बोलणीचालणी करून त्यांना विमानातून भेटीदाखल काहीतरी वस्तु टाकून त्यांच्याशी थोडा परिचय करून घेतला. आणि मग त्यांच्या शेजारी झोपडी बांधून रहावयाचे या तरुणांनी ठरविले. हे साहस फार मोठे