पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

स्पॅनिश भाषेत चाले. पण त्या जमातीला ती भाषा येत नव्हती. एक दिवस तेथला एक मनुष्य त्यांना म्हणाला की, 'तुमचा देव जर सर्वज्ञ आहे तर त्याला आमची भाषा कशी येत नाही ?' या प्रश्नाने अंकल कॅम अस्वस्थ झाले. त्यांनी बायबलपुराण लगेच बंद केले आणि त्या जमातीत राहून प्रथम त्यांनी त्यांच्या भाषेचा अभ्यास केला. मग त्यांनी तिला लिपि लावून दिली, तिचे व्याकरण तयार केले, कोश केला आणि मग त्या कॅचिक्वेल भाषेत बायबल छापून त्या लोकांना साक्षर करून त्यांना जीजस् च्या धर्माची दीक्षा दिली. यात पंधरा वर्षे गेली. १९३२ साली त्यांना क्षय झाल्यामुळे ते परत अमेरिकेत गेले. तेथे ते रुग्णावस्थेत असताना त्यांचा एक जुना मिशनरी मित्र त्यांना म्हणाला, की, 'तुम्ही एका भाषेसाठी केले ते दक्षिण अमेरिकेतील गहन जंगलात ज्या शेकडो रानटी जमाती आहे त्यांच्या भाषेसाठी का करू नये ?' ही झेप फारच मोठी होती. पण हे कार्य अंगीकारावयाचे असा त्या दोघा मित्रांनी निश्चय केला. क्षयातून मुक्त होताच कॅम यांनी १९३४ साली 'समर इन्स्टिट्यूट ऑफ लिंग्विस्टिक्स' या संस्थेची स्थापना केली. दक्षिण अमेरिकेतील हजार दोन हजार भाषांचा अभ्यास करून वरील प्रकारे त्यांची लिपि, व्याकरण व कोश तयार करून त्यांच्यापर्यंत बायबलचा संदेश पोचवावयाचा, व त्यांना श्रेष्ठ धर्माचा उपदेश करून सुसंस्कृत करावयाचे हा त्या संस्थेचा उद्देश आहे. आज ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत या संस्थेच्या शाखा आहेत. त्यांतून दरसाल पाचशे तरुण विद्यार्थी बाहेर पडतात. आणि ब्राझिल, मेक्सिको, पेरू, अलास्का येथील घनदाट अरण्यातील रानटी जमातीत जाऊन राहतात. त्यांच्या भाषेचा अभ्यास करून त्यात बायबलची भाषांतरे करतात आणि जीजस् च्या अमृतवाणीचा लाभ त्यांना करून देतात. भाषाशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच त्या तरुणांना जंगलच्या राहणीचा अभ्यास व सरावहि करावा लागतो. झाडाच्या फांद्या तोडून टहाळे आणून झोपडी बांधणे, वाटेल त्या हवेत रहाणे, उत्तम प्रकारे पोहणे व सुसरी-मगरीशी झुंज घेणे, सर्व प्रकारच्या विषारी सापांची माहिती करून घेणे, जमिनीवर उघड्यावर निजणे, मिळेल त्या अन्नावर निर्वाह करणे हा सराव त्यांना करावा लागतो; कारण त्यांचे पुढले सर्व आयुष्य दण्डकारण्यासारख्या गहन अरण्यात जावयाचे असते. असे हे खडतर जीवन पुढे दिसत असूनहि शेकडो तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनी