पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
वैयक्तिक व सामाजिक

कैदी, कुमारी माता, रुग्ण, दलित यांच्या सेवेसाठी इव्हँजेलाइन बूथने भराभर मंडळे स्थापन केली. ते कार्य पाहून मुक्तिफौजेला अमेरिकन नागरिक भराभर येऊन मिळू लागले. त्यांच्या हे ध्यानात आले की केवळ कायद्याने समाजाचे रक्षण होत नसते. त्याच्यामागे धर्मशक्ति असली तरच कायदा हा प्रभावी होतो. आणि ही धर्मशक्ती ईव्हा बूथ मुक्तिफौजेच्या रूपाने उभी करीत होती. अमेरिकेत असे यश मिळाल्यानंतर ईव्हा जगभर संचार करू लागली आणि तिने फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जपान, हिंदुस्थान, या देशांत मुक्तिफौजेच्या शाखा स्थापन केल्या. आपल्या यशाचे रहस्य सांगतांना ती म्हणाली, 'संग्राम, लढा ही मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. ती नष्ट करू नका. मात्र त्याचे खरे शत्रू त्याला दाखवून द्या. संघटना करावयाची ती प्रपंचाच्या उत्कर्षासाठी करा. अशा रीतीने धर्मनिष्ठेने केलेला जो लढा असेल त्यातूनच एक दिवस सत्ययुग निर्माण होईल.'
 ब्रिटिशपूर्व काळात सतराव्या शतकात समर्थांनी समाजोन्नतीचे हेच मर्म जाणून आपली संघटना उभारली होती. धर्माला त्यानी 'मराठा तेवढा मेळवावा,' असे सांगून सामाजिक दृष्टि दिली होती. आणि सामाजिक संकटाचा परिहार समाजशक्तीने करावयाचा हे धोरण आखले होते. आणि हे सर्व ईश्वराचे अधिष्ठान कायम ठेवून. एवढ्यामुळे महाराष्ट्रात केवढे सामर्थ्य निर्माण झाले होते ते आपल्याला माहीतच आहे. दुर्दैवाने समर्थांच्यासारखा हे धर्मस्वरूप जाणणारा एकही पुरुष त्यांच्या पश्चात् निर्माण झाला नाही. त्यामुळे आपला धर्म हा विकलांगच राहिला. मोक्षधर्म, हेच त्याचे रूप राहिले. संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनच गीता किंवा ज्ञानेश्वरी आणि दासबोध सुद्धा वाचावयाचा, कारण संसाराच्या यशाचा व धर्माचा काही संबंध नाही, असेच लोकांनी ठरवून टाकले होते. त्यामुळे अभ्युदयवादी धर्मसंघटना ही समाजोन्नतीसाठी अवश्य असणारी जी महाशक्ति तिला आपण पारखेच राहिलो.
 धर्मनिष्ठा ही आजहि, या विज्ञानयुगातहि, पाश्चात्त्य देशात कशी जिवंत आहे ते सांगून हे विवेचन आता संपवावयाचे आहे. विल्यम कॅमेरोन टाऊनशेंड ऊर्फ अंकल कॅम हे एक मिशनरी आहेत. आज त्यांचे वय ६३ आहे. १९१७ साली वयाच्या एकविसाव्या वर्षी ते ग्वाटेमालामध्ये धर्मप्रसारार्थ गेले. आणि कॅचिक्वेल या रानटी जमातीमध्ये त्यांनी कामाला प्रारंभ केला. त्यांचे कार्य