पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

१८६५) हिने जगभर प्रसृत केलेल्या मुक्तिफौजेचा इतिहास असाच आहे. दीन, क्षुधित, भ्रष्ट, पापी, भग्न, निराश, पराभूत, बहिष्कृत, असहाय, यांना दैन्यातून, पशुतेतून मुक्त करण्यासाठी ही फौज उभी होती. आरंभी यांचाहि क्वेकर लोकांप्रमाणेच छळ झाला. विल्यम बूथच्या सभा पोलीस उधळून लावीत, गुंड-मवाली त्याला मारहाण करीत, दारूबंदीचा तो प्रचार करीत असल्यामुळे कलाल लोक संगनमत करून त्याला तुरुंगात धाडीत. पण त्याने माघार घेतली नाही. सतराव्या अठराव्या वर्षी त्याच्या कन्येने त्याची धुरा खांद्यावर घेतली आणि मग त्या धर्मसंघटनेला तेज चढले. तिच्या व तिच्या अनुयायांच्या आत्मक्लेशामुळे जनता जागृत झाली. इंग्लिश नागरिकांना तिच्या कार्याचा अर्थ कळू लागला. त्यांच्या हे ध्यानात आले की भुकेलेल्यांच्या अन्नवस्त्राची सोय करण्यासाठी पार्लमेंटमध्ये नुसते वादविवाद चालू आहेत. पण मुक्तिफौजेने तीस लाखांची सोय करीत आणली आहे. त्यामुळे मग श्रीमंतांनी आपल्या तिजोऱ्या उघडल्या व मुक्तिफौजेला अमाप पैसा मिळू लागला. धर्मसंघटनेतील सामाजिक पुण्याची दृष्टी ती हीच. एखादुसऱ्या धनिकाने पुण्यप्राप्तीसाठी केवळ ब्राह्मणांसाठी अन्नछत्र घालणे निराळे आणि लाखो भुकेल्या लोकांची जबाबदारी आपल्यावर आहे हे जाणून सर्व समाजाने धन देणे निराळे. युरोपातल्या धर्मसंघटनांनी हे कार्य घडवून आणले. आणि दीनदलितांना जागृत करून, त्यांना प्रतिकाराला सिद्ध करून, त्यांच्या जीविताची प्रतिष्ठा वाढवून, घडवून आणले. धर्म ही सामाजिक उत्कर्षाची अजूनही युरोप-अमेरिकेत एक मोठी जिवंत शक्ती आहे याचे कारण हेच आहे. भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर, पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर स्थापन झालेल्या आर्यसमाज, ब्राह्मसमाज, रामकृष्ण मिशन यांच्या कार्याकडे पाहिले तर याची काहीशी कल्पना येऊ शकेल. या संस्थांकडे एकदम तरुण शक्ती आकृष्ट झाली व समाजसेवेचे व्रत तिने घेतले हे आपण पहातच आहो. धर्म ही जिवंत शक्ती असणे याचा हाच अर्थ आहे. तरुणांना आत्मार्पणाची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असणे हेच जिवंतपणाचे लक्षण. आणि दीनदलितांचा ऐहिक उद्धार हे कार्य डोळ्यासमोर असले, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लढा देण्याचे आवाहन असले, की धर्माला हे सामर्थ्य प्राप्त होते. मुक्तिफौजेच्या यशाचे हेच रहस्य आहे. तुरुंगातील