पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
वैयक्तिक व सामाजिक

धर्म निर्माण करण्यासाठी निर्माण झाले होते. या धर्मात श्रद्धा, ईश्वरभक्ति यांना स्थान होतेच. भगवंताचे अधिष्ठान हा त्यांचा आत्माच होता. पण या अनाथ अपंगांच्या ऐहिक जीवनात प्रतिष्ठा निर्माण करणे याला त्यांच्या दृष्टीने इतकेच महत्त्व होते. साल्व्हेशन आर्मीचा- मुक्तिफौजेचा- संस्थापक विल्यम बूथ म्हणतच असे की 'उपाशी पोटावर धर्मोपदेश याला अर्थच नाही.' म्हणून हे धर्मपंथ प्रथम भुकेलेल्यांना अन्न देण्याची व्यवस्था करीत. आणि ही व्यवस्था केवळ तात्कालिक नव्हती. तशी अन्नछत्रे ते उघडीतच. पण ती शाश्वतची व्यवस्था व्हावी म्हणून दलितांच्या बाजूने ते मालकवर्गाशी संग्रामच मांडीत. किंबहुना त्यांच्या चळवळीचे स्वरूपच असे होते की त्यातून हा संग्राम निर्माण होणे अपरिहार्य होते. यामुळेच या पंथांना सत्ताधाऱ्यांकडून कडवा विरोध होत असे. मेथॉडिस्ट पंथाचा संस्थापक वेसले याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला तो किंग्जवूड येथील खाणीकामगारांच्यापासून. त्यांना हा स्वर्गच भूवर आला असे भासले. कारण त्यांच्याशी एकजीव होऊन राहणारा धर्मगुरू त्यांनी पाहिलाच नव्हता. तेथून प्रारंभ करून मग खेड्या- पाड्यातून वेसले हिंडू लागला. लवकरच हजारो लोकांनी या धर्मपंथाची दीक्षा घेतली व इंग्लंड, आयर्लंड, वेल्स येथे सर्वत्र त्यांनी मंडळे स्थापन केली. कोणासाठी ? असहाय, भग्न, जीवितांसाठी ! चोर, दरोडेखोर, दारुडे, मवाली यांच्यात मेथॉडिस्ट मिसळले आणि त्यांचे नैतिक परिवर्तन त्यांनी घडवून आणले. असल्या लोकांना, इतक्या हीन पातळीवरच्या हजारो लोकांना, जीवनांत पुन्हा सुप्रतिष्ठित करणे ही केवढी देशसेवा आहे ! पाश्चात्त्य देशात लोकशाहीचा पाया घातला गेला तो यामुळेच. तुरुंगाच्या रौरवात पिचत पडलेले, गुलामगिरीमुळे पशुवत् झालेले, व्यसनाधीनतेमुळे माणुसकी नष्ट झालेले, नीतिभ्रष्ट झालेले, राजे, भांडवलदार, धर्मगुरू यांच्या जुलमाने दीन झालेले- अशा लोकांच्या जीविताला व्यक्तित्वाची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य या धर्मपंथांनी केल्यामुळेच तेथील समाज लोकशाही पेलण्यास समर्थ झाला. भारतातल्या धर्मधुरीणांनी हे कार्य केले नाही. त्यामुळे येथे प्रजेचे व्यक्तित्व विकसित झाले नाही. आणि लोकशाहीला लागणारा मूलाधारच येथे निर्माण झाला नाही.
 विल्यम बूथने स्थापिलेल्या व त्याची कन्या इव्हँजेलाइन बूथ (जन्म