पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

धर्म कालांतराने निष्प्रभ होतो. वारकरी पंथाचे तेच झाले. त्यांनी तुकोबांचे निवृत्तीचे बोलच खरे मानले व त्यावरच भर दिला. 'जेथे अन्याय होतो, जेथे गुंड सज्जनांना मारीत असताना त्यांचे कोणी निवारण करीत नाही, जेथे अविचारी सत्ताधारी प्रजेला बुडवीत असतात, अशा गावी भल्या माणसाने राहूं नये; त्यापेक्षा सुखाने गिरिकंदरांत जाऊन रहावे,' असे तुकोबांनी एका अभंगात सांगितले आहे. (जोग गाथा - ३२२०). वारकऱ्यांनी एवढेच लक्षात ठेविले. 'नाठाळांच्या काठी हाणू माथा' हे मात्र ते विसरून गेले. महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास फारसा उपलब्ध नाही पण वाङमयाच्या इतिहासावरून जो थोडासा सामाजिक इतिहास दिसतो त्यात अन्याय झाला, आपत्ति आली की संसाराला विटून, विरक्त होऊन निवृत्त होणाऱ्यांची कितीतरी उदाहरणे सांपडतात. दासोपंतांच्या वडिलांना सरकार-देणे नीट देता आले नाही म्हणून यवन पादशहाने त्यांच्या मुलाला, दासोपंतांना पकडून नेले व त्यांना बाटविण्याची धमकी दिली. पुढे ती आपत्ति टळली. पण येवढ्या तडाख्याने दासोपंत संसारदुःखें दुखावले व परमार्थाचे अधिकारी झाले. त्यांचे समकालीन जनी जनार्दन यांची कथा अशीच आहे. सर्वत्र हीच कहाणी आहे. संकट आले तर त्याला तोंड देऊन त्याच्यावर स्वार व्हावे व समाजशक्ति जागृत करून निर्भयपणे आक्रमणाला तोंड द्यावे ही वृत्ती येथे निर्माण झालीच नाही. छत्रपतींच्या व समर्थांच्या काळी राजकीय क्षेत्रात ती निर्माण झाली. आणि तेवढ्या शक्तीने मोगल सामाज्य नष्ट झाले. पण, नीतिधैर्याची जोपासना करून सामाजिक अन्यायावर प्रहार करावा, दीन, दलित, अनाथ, अपंग यांच्यावर जुलूम करणाऱ्यांना जाब विचारावा आणि त्यासाठी होतील त्या क्रूर शिक्षा भोगून पुन्हा प्रतिकारार्थ सिद्ध व्हावे ही क्वेकरांची वृत्ती येथे भारतात कधीच निर्माण झाली नाही. प्रतिकारावाचून अन्याय, विषमता, जुलूम हा कधी दूर होत नाही. अस्पृश्यांना ही प्रतिकाराची चेतावणी त्याच काळात दिली गेली असती तर त्याच वेळी त्यांचे जीवन उजळून जाऊन आपला समाज संघटित व समर्थ झाला असता.
 सतराव्या अठराव्या शतकांत युरोपात जे धार्मिक पुनरुज्जीवन झाले त्याने हेच कार्य साधले. क्वेकर, मेथॉडिस्ट, इव्हँजेलिकल, जेसुइट, साल्व्हेशन आर्मी हे आणि असे इतर अनेक पंथ दीन-दलितांच्या जीवनात खरा