पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
वैयक्तिक व सामाजिक

ही त्यापेक्षाहि महत्त्वाची घटना होय. जॉर्ज फॉक्स हा विश्वातल्या दैवी तत्त्वाचा प्रत्यक्ष आविष्कारच होय. या चर्मकाराचे दुकान हे पोपच्या निवासापेक्षा जास्त पवित्र होते. तेथे त्याने टाकलेला प्रत्येक टाका हा गुलामगिरी, धनसत्ता यांच्या काळजात शिरत होता." त्या वेळी सर्व युरोपात स्वतंत्र पुरुष असा एकच होता व तो म्हणजे जॉर्ज फॉक्स हा होय. पश्चिम युरोपात राष्ट्रनिष्ठा, लोकशाही ही तत्त्वे जनमनात रुजून पुढे विकसित झाली त्याचे इतर राजकीय, सामाजिक चळवळींना जितके श्रेय आहे तितकेच या धार्मिक चळवळींनाहि आहे. अन्यायाचा प्रतिकार हा मानवी सामर्थ्याचा सर्वश्रेष्ठ आविष्कार होय. त्यामुळेच इतिहास घडत असतो, युगपरिवर्तन होत असते. जॉर्ज फॉक्सने क्वेकर पंथाची स्थापना करून प्रतिकाराची शिकवण दिली. त्याचे अनुयायी मदांध, उन्मत्त मालकवर्गाकडे जाऊन, गुलामांना मुक्त करा, असे त्यांना बजावीत, भ्रष्टाचारी धर्मगुरूंच्या समोर जाऊन त्यांच्या मग्रूरीची निर्भर्त्सना करीत आणि लाचार न्यायाधीशापुढे जाऊन त्यांनी केलेल्या अन्यायाचा जाब विचारीत. आणि यामुळे होणारी फटके, तुरुंग, शिरच्छेद, फाशी ही शिक्षा आनंदाने सोशीत. निर्भय सत्याग्रहात जनताजागृतीचे केवढे सामर्थ्य असते हे महात्मा गांधींनी जगाला दाखविलेच आहे. हे सामर्थ्य युरोपातल्या धर्मपंथांनी सतराव्या शतकातच युरोपला दिले होते.
 आपल्याकडे महाराष्ट्रात साधारण याच काळात, 'आम्ही विष्णुदास मेणाहुनि मऊ असलो तरी वज्राला भेदून टाकण्याइतके कठिण आहो, आम्ही नाठाळाच्या माथी काठी मारल्यावाचून रहाणार नाही' असा वीरवाणीचा संदेश तुकोबांनी दिला होता. पण येथला वारकरी अखेरपर्यंत दीनदुबळा, नेभळा, प्रतिकारशून्य असाच राहिला. सामाजिक वा धार्मिक अन्यायाचा प्रतिकार करण्याचे व्रत घेऊन तशी धर्मसंघटना येथे कोणी केलीच नाही. वारकरी पंथात अस्पृश्यांचा समावेश संतांनी आग्रहाने करून घेतला. पण त्यामुळे त्यांना मोक्षमार्ग खुला झाला इतकेच. तेथे जी समता संतानी प्रतिपादिली तिला सामाजिक अर्थ कोणी प्राप्त करून दिला नाही. वर सांगितलेच आहे की मोक्षधर्माला सामाजिक अर्थ, ऐहिक उन्नतीचा भाव प्राप्त झाला नाही तर त्याला तेज चढत नाही. त्यातून सामर्थ्य निर्माण होत नाही. जो धर्म इहलोकी होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार हे आपले ब्रीद मानीत नाही तो