पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

काम संपले तेव्हाच ते घरी अमेरिकेला परत आले. पण खरे आश्चर्य ते पुढेच आहे. प्रकृति सुदृढ होताच पुन्हा अशाच तऱ्हेचे कार्य करण्यासाठी ते घर सोडून लाओसमध्ये गेले. तेथे जाण्यात त्यांचा हाच हेतु होता. उज्ज्वल भवितव्य व सुखी संसाराची स्वप्ने, सोडून हा तीस वर्षांचा तरुण, आपल्या पाच-सहा सहकाऱ्यांसह आशियातल्या त्या अडाणी, मागासलेल्या, हजारो मैल दूर असलेल्या अर्धरानटी प्रदेशात कशाला गेला ? पूर्व-पश्चिमेतले अंतर कमी करण्यासाठी, जगातल्या लोकांचा दुःखभार कमी करण्यासाठी ! विश्वबंधुत्व यावयाचे असेल तर याच मार्गाने येईल अशी डॉ. डूले यांची श्रद्धा आहे. अमेरिका परराष्ट्राना साह्य करते ते रुग्णसेवेच्याच मार्गाने करावे असे त्यांचे मत आहे. आरोग्यदान हे सर्वांत श्रेष्ठ दान होय. ते राष्ट्राच्या अंतरात्म्याला जाऊन भिडते. आरोग्यदान म्हणजे साक्षात् परमेश्वराची, जीजस् ची कृपादृष्टीच होय, असे डूले यांना वाटते. आणि याच श्रद्धेने घरदार सोडून ते पूर्ण परकीय अशा समाजाच्या सेवेला वाहून घेतात. 'हे विश्वचि माझे घर' या तत्त्वाचे हेच खरे आचरण नव्हे काय ?
 पण मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या आरोग्यसंवर्धनासाठी सर्वस्व अर्पण करावे, प्राणहि वेचावे ही वृत्ति पाश्चात्त्य समाजात किती दिसून येते याचे वरच्यापेक्षाही विलक्षण असे एक उदाहरण सांगतो. ते वाचून तशा तऱ्हेचा उपदेश संतांनी केला असूनही आपल्या इतिहासात तशी उदाहरणे का सापडू नयेत याचा वाचकांनी विचार करावा. कॅन्सर हा रोग किती भयंकर आहे व दिवसेदिवस तो जगाला कसा ग्रासीत चालला आहे, हे सर्वांना माहीतच आहे. त्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी अमेरिकन डॉक्टरांचे सतत प्रयत्न चालू आहेत. अशाच डॉक्टरांपैकी डॉ. चेस्टर साऊदॅम हे एक आहेत. त्यांना लसीचे प्रयोग करण्यासाठी काही माणसे हवी होती. स्वतःच्या दण्डात कॅन्सरचे जंतू टोचून घेणारे लोक हवे होते. असे लोक कोठे मिळणार ? त्यांनी ओहिओ संस्थानातील कोलंबस या नगरच्या तुरुंगावरच्या अधिकाऱ्यांना लिहिले की जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांपैकी यासाठी कोणी तयार असल्यास चौकशी करावी. अधिकाऱ्यांनी तुरुंगातील फलकावर तशी नोटीस लावली. आणि आश्चर्य असे की पंचवीस लोक हवे अशी नोटीस लावलेली असताना १३० जन्मठेपीच्या कैद्यांनी अर्ज केले. डॉक्टर चेस्टर अगदी चकित झाले. कॅन्सर