पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०
वैयक्तिक व सामाजिक

होऊन व्हिएटनाममध्ये उत्तर व्हिएटनाम व दक्षिण व्हिएटनाम असे दोन विभाग झाले. उत्तर व्हिएटनाम कम्युनिस्टांच्या ताब्यात गेले. काही काळ दोन्ही विभागातील लोकांना कोणाच्याही विभागात जाऊन स्थायिक होण्यास मुभा देण्यात आली. त्यावेळी उत्तरेस कम्युनिस्टांचे भयानक अत्याचार सुरू झाले. तेव्हा तेथून दक्षिणेत हजारो, लाखो निर्वासित येऊ लागले. त्यांची व्यवस्था लावण्यासाठी अमेरिकन आरमाराने हाइफांग येथे छावण्या उभारल्या होत्या. आणि डॉ. डूले यांना तेथे आरोग्याधिकारी नेमले होते. कम्युनिस्ट अत्याचारांना बळी पडलेल्या व उपासमार, हालअपेष्टा, चिंता यांमुळे अनेक रोगांनी ग्रस्त झालेल्या त्या हजारो रोग्यांना पाहून डॉ. डूले यांचे काळीज फाटून जाई. यांच्या शुश्रूषेचे अपार कष्ट, अतिमानुष कष्ट आपल्याच्याने होणार नाहीत असे कित्येकदा त्यांच्या मनात येई. तेथे राहण्याचे त्यांच्यावर बंधन नव्हते. ते अमेरिकन आरमारातले डॉक्टर होते. कोणाच्याहि क्षणी त्यांना घरी परत जाता आले असते. तेथे गेल्यावर त्यांचा व्यवसाय उत्तम प्रकारे सुरू झाला असता. आणि धनदौलत मिळवून ते प्रपंच करून सुखी झाले असते. पण ते परत गेले नाहीत. जवळ जवळ ६ लाख निर्वासित उत्तरेतून दक्षिणेत आले. तेवढे सगळे हाइफांग छावणीतून सुखरूप जाईपर्यंत ते तेथेच त्यांची शुश्रूषा करीत राहिले. कशासाठी ? प्रारंभी रोज त्यांच्या मनात प्रश्न येई. आपण कशासाठी येथे राहात आहो ? येथे आपले कोण आहे ? यावेळी लहानपणी ते जे स्तोत्र म्हणत त्याची त्यांना आठवण होई. 'देवा, आम्हाला दुःखमुक्त कर, आम्हाला संकटातून सोडव.' या लक्षावधि अपंगांना दुःखमुक्त करणे आपले कर्तव्य आहे असा त्यांच्या मनाचा निश्चय झाला व ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. दीन, दरिद्री, अनाथ, अपंग असे हे निर्वासित होते. अडाणी होते. अस्वच्छ, घाणेरडे होते. कित्येकांचे पाय कम्युनिस्टांनी तोडले होते, डोळे फोडलेले होते. कित्येकांना ठेचून काढले होते. असे हे अत्यंत भयभीत, भग्न, लोक हजारांनी छावणीत येत. ते दृश्य नुसते पाहूनच सामान्य माणूस खचून गेला असता. अशा लोकांची शुश्रूषा डॉ. डूले शेवटपर्यंत करीत राहिले. कित्येक वेळा ते लोक चवताळून जात. डॉक्टरांना मारहाण करीत. एकदा डूले यांची अशा मारामुळे दोन हाडे मोडली. पण त्यांनी कार्य सोडले नाही. शेवटी त्यांना मलेरिया लागला. आतडी बिघडून गेली. तरी त्यांनी छावणी सोडली नाही.