पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
वैयक्तिक व सामाजिक

म्हणजे यमयातना आहेत, तो जिवंत मृत्यु आहे हे त्यांनी त्या कैद्यांना पुन्हा नीट समजावून दिले. पण एकानेही नाव मागे घेतले नाही. त्यापैकी काहीना डॉक्टरांनी विचारले, 'हया मरणयातना सोसायला तुम्ही का तयार होता ?' एकाने उत्तर दिले, 'माझे वडील कॅन्सरने गेले. तेव्हा त्यासाठी काही सेवा करायला मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान् समजेन.' दुसरा म्हणाला, 'येथे तुरुंगात मी इस्पितळात काम करतो. तेथे मी कॅन्सरच्या यातना पाहिल्या आहेत. तो दुःखभार हलका व्हावा म्हणून मला हे केलेच पाहिजे.' तिसरा म्हणाला, 'इतके दिवस मी पाप केले. आता काही सेवा घडली तर बरेच होईल.' (रीडर्स डायजेस्ट, जून १९५८)
 धर्माच्या कोणच्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तरी आपल्याला असेच दिसेल की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त असा उपदेश केला असूनही त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कोणी घेतलीच नाही. धनाचे दान हे धर्मदृष्टीने केवढे पुण्य आहे ? श्रीमंतांनी गरिबांना दान द्यावे असा उपदेश पावलोपावली संतांनी केला आहे. पण येथल्या श्रीमंतांनी दाने कशी दिली ? त्यांनी मंदिरे बांधली, घाट बांधले, त्यांच्या व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या. ब्राह्मणांसाठी अन्नछत्रे घातली. त्यांसाठी उत्पन्न नेमून दिले. पण रुग्णालयासाठी, पाटबंधाऱ्यासाठी, शेतीसुधारणेसाठी, तुरुंगसुधारणेसाठी, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणी दाने दिली नाहीत. याचा अर्थ असा होतो की स्वतःच्या पारलौकिक कल्याणासाठी, पुण्यासाठी ही दाने दिली जात. त्या लोकांना दीनांची दया येत नसे असे नाही. पण त्या दीनांची कायमची उन्नति व्हावी, या क्षणाला कळवळा येऊन आपण त्याला थोडे द्रव्य देण्याने त्याचा प्रश्न सुटत नाही, तो सोडविण्याचा कांही प्रयत्न केला पाहिजे अशी भावनाच कोणाच्या चित्तात येथे उदित झाली नाही. ती झाली असती तर येथे आमूलाग्र क्रांति झाली असती. पाश्चात्त्य समाज उत्कर्ष पावला तो त्या समाजाच्या धर्मबुद्धीला हे वळण मिळाले म्हणून. रॉकफेलर हे नाव आता जगप्रसिद्ध झाले आहे. त्याने केलेले दान या प्रकारचे आहे. नवकोटनारायण हा शब्द त्याच्या वर्णनाला थिटा पडेल. अपार, अगणित संपत्ति येवढेच म्हणता येईल. आणि तरीही त्या संपत्तीची कल्पना येणार नाही. या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न येताच जॉन रॉकफेलर तरुण वयातच सर्व व्यवसायातून