पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

लिहून ठेविले आहे. पाश्चर नेहमी म्हणे, 'मला जगात प्रत्येक गोष्ट म्हणजे अनंताचा आविष्कार आहे असे वाटते. माझी दैवी शक्तीवर नितांत श्रद्धा आहे. प्रत्येकाच्या हृदयात ती असतेच. ज्ञानविज्ञानाची मला लालसा आहे. विश्वातील गूढ शक्तीने दिलेली ही प्रेरणा आहे असें मला वाटते.-' तो आपल्या प्रयोगशाळेत प्रयोग करी तेव्हा बायबलच्या उपदेशाचेच आपण आचरण करीत आहो, अशी त्याची श्रद्धा असे. (वन् हंड्रेड ग्रेट लाइव्हज्, पृ. १०६, १०७). मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारा विख्यात डॉ. रोनाल्ड रॉस हा हिंदुस्थानातील ब्रिटिश लष्करातला नोकर. प्रथम ललित वाङमय, गणित यांच्या अभ्यासात तो आपला रिकामा वेळ घालवी. पण एक दिवस त्याचा विवेक जागृत झाला. हिंदुस्थानातील ती भयंकर रोगराई पाहून त्याचे हृदय दुभंगून गेले. आपण या मानवी दुःखाचा परिहार करण्यासाठी आतापर्यंत काहीच केले नाही, ही टोचणी त्याच्या मनाला लागली. म्हणून मग त्याने काय केले ? काय करावयाचे ते युरोपीय मनाचे ठरलेले आहे. सामाजिक अन्यायाने होरपळून निघालेला माणूस पाहिला तर त्याला थोडे द्रव्यदान करावे, त्या एका माणसाचें दुःख कमी करून, तेवढ्यावर आत्मसंतोष प्राप्त करून घ्यावा ही पाश्चात्त्य धर्मनिष्ठ पुरुषांची वृत्ति नाही. ते त्या सामाजिक दुःखाच्या मुळावर घाव घालतात हे वर सांगितलेच आहे. रोनाल्ड रॉसने तेच केले. व्याधीने पीडलेली माणसे त्याने पाहिली, त्याची धर्मबुद्धि जागृत झाली. आणि त्याने जंतुशास्त्राच्या अभ्यासास प्रारंभ केला ! व सतत आठदहा वर्षे तपश्चर्या करून मानवजातीच्या शत्रूला- मलेरियाच्या जंतूला- त्याने जिंकले. या जंतूचा शोध लागताच त्याने आपली उपकरणे बाजूला ठेविली व एक स्तोत्र रचले. 'परमेश्वरी योजनेमुळे आज माझ्या हातून एक विलक्षण शोध लागला आहे. त्याच्या कृपेने लक्ष- लक्ष जीवांचा संहार करणाऱ्या यमदूतांची काळी कृत्ये मला उमगली आहेत. यांमुळे आता अनंत जीव वाचतील. यमराजा, आता तुझे पाश व्यर्थ होत !' (सिक्स ग्रेट डॉक्टर्स- क्रोथर.)
 आजहि पाश्चात्त्य जगात, विज्ञानवादी, बुद्धिवादी, जडवादी, पाश्चात्त्य जगात हीच धर्मप्रेरणा लोकांना कशी कार्यप्रवृत्त करीत आहे ते डॉ. थॉमस डूले, एम्. डी., यांच्या चरित्रावरून दिसून येईल. फ्रेंच इंडोचायनामध्ये लढाई