पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैयक्तिक व सामाजिक

या वसाहतीत तीन-चतुर्थांश रोगी हवाईजनच आहेत. इतर जपानी, पोर्च्युगीज, चिनी, कोरियन असे आहेत. डॉक्टर मात्र बहुतेक पाश्चात्त्य आहेत. कोणी तेथे १० वर्षे आहेत, कोणी १५ तर कोणी ५० वर्षे आहेत. आज सत्तराव्या वर्षीहि डॉ. पीटर या दुःखितांची सेवा निष्ठेने करीत आहेत. या सर्व डॉक्टरांची वाणी अत्यंत गोड, स्वभाव अत्यंत प्रेमळ व धर्मनिष्ठा जाज्वल्य आहे.
 रुग्णांची शुश्रूषा करणे, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करणे, त्यांच्यासाठी रुग्णालये बांधून तेथे त्यांची राहण्याची सोय करणे हे फार मोठे धर्मकार्य आहे अशा तऱ्हेचा उपदेश आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहार हे युरोपात १४ व्या शतकापासून चालू आहे. प्रत्येक गोष्टीसाठी संघटना उभारून सामाजिक दुःखाचे मूलच्छेदन करणे हीहि वृत्ति युरोपात तेव्हापासून दिसते. इटालीतील मिलन, व्हेनिस या शहरी १३०५ सालापासून रुग्णालयें असल्याचा पुरावा मिळतो. पंधराव्या शतकात फ्लॉरेन्स या एका शहरात ३५ रुग्णालये होती. आणि ती सरकारी व धनिकांच्या देणग्यांवर चालत असत. लूथर हा जुन्या कॅथॉलिक धर्माचा द्वेष्टा होता. पण कॅथॉलिकांनी चालविलेल्या रुग्णालयांचे त्याने प्रसन्न मनाने वर्णन करून ठेविले आहे. या रुग्णालयात रोग्यांना उत्तम औषधोपचार होत, वैद्य कुशल असत व रोग्यांना चांगले अन्न देण्याचीहि व्यवस्था असे असे तो म्हणतो. सर्व इटलीभर या काळात रुग्णालये, अनाथगृहे, अन्नछत्रे व शाळा दिसून येत. या सर्व संस्था धर्मार्थ असून त्या धर्मगुरूंनी चालविलेल्या होत्या. मृत्युपत्रात रुग्णालयांसाठी देणग्या देण्याची व्यवस्था करून ठेवणे ही पद्धत त्यावेळी रूढच होती. फ्रॅन्सिस्कन, डॉमिनिकन या धर्मपंथांचे लोक अशा संस्थात अहोरात्र सेवेसाठी तयार असत. सेंट बर्नाडिनो (जन्म १३८०) व सेंट कॅथॉराइन ही या पंथातील संतांची नावे त्यावेळी प्रसिद्ध होती. त्यावेळी इटलीभर भयंकर साथी येत. त्या साथीत यांनी रात्रंदिवस रोग्यांची शुश्रूषा करण्याचेच व्रत घेतले. (स्टोरी ऑफ सिव्हिलिझेशन- विल्ड्युरेन्ट- खंड ५ वा, प्रकरणे १९ व २०) हीच वृत्ति युरोपात पुढे परिणत होत गेली. वैद्यकशास्त्रात पाश्चर, रोनाल्ड रॉस यांसारखे जे मोठेमोठे संशोधक होऊन गेले त्यांची मूळ प्रेरणा आर्तांचे दुःखनिवारण हीच होती. त्यांनी स्वतः व त्यांच्या चरित्रकारांनी हे स्पष्टपणे