पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

तेथे रुग्णांना, व्याधिग्रस्ताना औषधे देऊन, त्यांच्यासाठी रुग्णालये स्थापून त्यांची अहोरात्र शुश्रूषा करून दीन दुःखितांचा भार हलका करीत आहेत हें प्रसिद्धच आहे. या बाबतींत त्यांना आपपरू ठावेच नाही असे दिसते. हिंदुस्थान, चीन, जपान, आफ्रिकेतील जंगले, अरबस्तानातील वाळवंटे, मध्य आशियातील डोंगरदऱ्या, पॅसिफिक महासागरातील बेटे, सर्वत्र ते हिंडतात. घरदार सोडून दीनदुःखित, अनाथ, अपंग, आंधळे, पांगळे, लुळे, यांच्यात राहतात. आणि त्यांची शुश्रूषा करून त्यांचा दुःखभार हलका करतात. त्यांच्या निराश, भग्न जीवनात काही सुखाचे क्षण निर्माण करतात.
 हुवाई बेटातील होनोलुलूपासून २०० मैलांवर असलेली मोलोकाई नावाची जी महारोग्यांची वसाहत आहे तिचा इतिहास वाचला म्हणजे युरोपीय लोकांची धर्मसेवा व आपली पूर्वकाळची पुण्यकल्पना यातील महदंतर कळून येईल. १८३० च्या सुमारास या बेटात हा रोग आला. तो पसरू लागताच सरकारने कडक कायदे केले. आणि संसर्ग पसरू नये म्हणून महारोगाची चिन्हे दिसू लागलेल्या पंचवीस रोग्यांना उचलले, गाडीत घातले आणि मोलोकाईच्या जंगलात नेऊन चक्क सोडून दिले. त्यांची कसलीही वास्तपुस्त सरकारने पुढे केली नाही. त्या हतभाग्यांनी ६-७ वर्षे कसेतरी जीवन कंठले. नंतर बेल्जम- मधील धर्मगुरू फादर डामियन तेथे आले. आणि त्यांना आपंगिता मिळाला. आज मोलोकाई ही एक उत्तम वसाहत आहे. सुमारे ५०० रोगी तेथे राहतात. त्यांना उत्तम झोपड्या आहेत, रुग्णालय आहे, डॉक्टर आहेत, दाया आहेत, औषधे आहेत. पण एवढेच नाही. फादर डामियन यांनी व त्यांच्यामागून आलेले फ्रेंच डॉ. पीटर, डॉ. टटल् इत्यादींनी ती एक रम्य वसाहत केली आहे. तेथे बागा आहेत. क्रीडांगणे आहेत. उद्योगकेंद्रे आहेत. लोक कचेरीत काम करतात, दुकाने चालवितात. शाळा चालवितात. तेथे विजेचे दिवे आहेत, मोटारी आहेत. लोक स्वतंत्र घरे बांधतात. विवाह करतात. आणि संसारही चालवितात. 'विश्वचि माझे घर' 'मुख्य पूजेचे आयतन, प्राणिमात्रा सुखदान' या वचनांना काही अर्थ असेल तर तो हा आहे. आणि तो पाश्चात्त्य धर्मनिष्ठांनी प्रत्यक्षात आणला आहे. फादर डामियन यांना स्वतःलाच शेवटी महारोग जडला व त्यातच त्यांचा अंत झाला. पण त्यामुळे मिशनरी घाबरले नाहीत. फादर पीटर तेथे आलेच. त्यांनाही महारोग झाला. पण त्यातून ते बरे झाले.