पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७१
अमेरिका : जगाच्या स्वातंत्र्याची ढाल

अमेरिकन लोकसभेने युरोपच्या साह्यासाठी ८००० कोटी रुपये मंजूर केले आणि हे सर्व साह्य बिनशर्त करण्याची घोषणा करून एका नव्या मन्वंतराला प्रारंभ केला.
 अमेरिकेच्या या योजनेची युरोपने फार प्रशंसा केली. अमेरिकेला मनापासून धन्यवाद दिले. 'या औदार्याला तोड नाही' असे चर्चिलसाहेबांनी उद्गार काढले. पण अमेरिकन जनतेने व नेत्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले की, यात औदार्य असे काहीच नाही. आम्ही हे आमच्या स्वार्थाच्या दृष्टीनेच करीत आहो. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही यांचे रक्षण हे आमचे उद्दिष्ट आहे. युरोप असाच दैन्यावस्थेत राहिला तर तो कम्युनिस्टांच्या भक्ष्यस्थानी पडेल आणि मग युरोपातून ही मूल्ये हद्दपार होतील. आणि आज युरोपवर जो प्रसंग तोच उद्या आमच्यावर ! हे ध्यानी घेऊन आत्मसंरक्षणाच्या हेतूनेच आम्ही ही योजना आखली आहे.
 जगातल्या उदयोन्मुख देशांनी अमेरिकेच्या इतिहासाचा अभ्यास करणे किती अवश्य आहे ते यावरून कळून येईल. स्वातंत्र्यापूर्वी भारतात शालेय अभ्यासक्रमात ब्रिटनचा इतिहास अवश्य म्हणून विषय होता. व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य, राजसत्तेशी संघर्ष, राष्ट्रनिष्ठा, विज्ञाननिष्ठा इहवाद या तत्त्वांचे संस्कार या इतिहासाच्या अध्ययनाने मुलांच्या मनावर लहानपणीच होत असत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात दुदैवाने ब्रिटनचा इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आला आहे. माझ्या मते हा फार मोठा प्रमाद होय. भारताला आपली लोकशाही यशस्वी करावयाची असेल तर ब्रिटनच्या इतिहासाला शालेय अभ्यासात पूर्वीचे स्थान देणे अवश्य आहे. आणि त्याबरोबरच महाविद्यालयात अमेरिकेचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणे हेही अवश्य आहे. कारण आज जगापुढे ज्या बिकट समस्या आहेत त्यांतील काहींची उत्तरे अमेरिकेला सापडली आहेत. भांडवली सत्तेशी झगडा कसा करावा, संपत्तीचे न्याय्य विभजन दंडसत्तेच्या अवलंबावाचून कसे करावे आणि राष्ट्राराष्ट्रातील संबंध स्नेहाचे, बंधुभावाचे कसे घडवावे ! याच आजच्या जगाच्या समस्या आहेत. अमेरिकेने त्या कशा सोडविल्या आहेत ते वर सांगितलेच आहे. भारताने अमेरिकेच्या इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या जनतेलाही या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडेल व