पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
वैयक्तिक व सामाजिक

हस्तक्षेप करण्याचा, त्याचे नियंत्रण करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र स्पर्धाशील मुक्त उद्योगांना (फ्री एंटरप्राइझ) पूर्ण अवसर देऊनच सर्व साधले पाहिजे असा तेथे दंडक आहे. अर्थसाधने शासनाच्या ताब्यात देणारा जो समाजवाद त्याचा अमेरिकन जनतेला अत्यंत तिटकारा आहे. लोकशाही समाजवाद हा 'वदतोव्याघात' आहे असे तिचे मत आहे. कारण एक अर्थव्यवहार जर शासनाच्या ताब्यात गेला तर सर्व जीवनच त्याच्या ताब्यात जाते व जनता गुलाम होते. म्हणून मुक्त उद्योग, मुक्त विनिमय हा जो भांडवली पद्धतीचा आत्मा त्याला धक्का लागता कामा नये असा अमेरिकनांचा कटाक्ष आहे. आणि भांडवली व्यवस्था व समाजकल्याण यांचा समन्वय साधता येतो हे त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिल्यामुळे लोकसुखाच्या दृष्टीने जगाचे एक पाऊल पुढे पडले आहे यात शंकाच नाही.
 जगाच्या इतिहासात अमेरिकेने तिसरीहि एक क्रांती घडविली आहे. १९४७ च्या मार्चमध्ये ब्रिटनचे एक शिष्टमंडळ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांच्याकडे गेले. युद्धात ब्रिटन विजयी झाले होते तरी त्याचा ताण तेथील अर्थव्यवस्थेला सहन न होऊन ती कोसळण्याच्या बेतात होती. ट्रुमन यांनी सीनेट व हाऊस- मधील नेत्यांना व आपल्या आर्थिक सल्लागारांना बोलावून एक बैठक घेतली व विचारविनिमय सुरू केला. त्याच वेळी इटली, फ्रान्स येथून ब्रिटनसारख्याच वार्ता येऊ लागल्या. त्यामुळे एकंदर युरोपच दारिद्र्य, उपासमार, निराशा, व अराजक यांच्या भेसूर मगरमिठीत सापडणार अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. अशा वेळी मागल्या साम्राज्यशाहीच्या युगात काय झाले असते ? शेजारचा देश दरिद्री झाला आहे, हतबल झाला आहे, अगतिक झाला आहे हे ऐकताच श्रीमंत, बलाढ्य देश त्याच्यावर झडप घालून त्याला गुलाम करून टाकीत व त्याचा रक्तशोष करीत. कायद्याचे राज्य जगात प्रस्थापित झाले होते. पण ते देशाच्या सरहद्दींच्या आत. दोन देशांच्या संबंधात जंगली दरोडेखोरीचाच न्याय जारी होता. स्वारी, लूटमार, साम्राज्य, रक्तशोष हेच निर्बलांचे भवितव्य होते. पण आता अमेरिकेने हे साम्राज्यशाहीचे युग संपुष्टात आणले आणि हतबल, दरिद्री झालेल्या देशांना सर्व प्रकारचे साह्य देऊन त्यांना फिरून सबल व संपन्न करण्याचे ध्येय डोळयांपुढे ठेवून त्यासाठी योजना आखली. सुप्रसिद्ध 'मार्शल योजना' ती हीच. अध्यक्ष ट्रुमन यांच्या मागणीप्रमाणे