पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६९
अमेरिका : जगाच्या स्वातंत्र्याची ढाल

ज्यांना मान्य नव्हती त्यांनाहि समाजवादावाचून तरणोपाय नाही असेच वाटत होते. धनोत्पादनाच्या सर्व साधनांवर समाजाची म्हणजेच सरकारची मालकी असणे यांचे नाव समाजवाद. धनिकवर्गाचा नाश करून ही मालकी प्रस्थापित करावी लागेल असे मार्क्सचे मत होते. इंग्लंडमधील समाजवादी लोकांना हा वर्गविग्रहाचा मार्ग मान्य नव्हता. हे लोकशाही मार्गानेच साधता येईल असे त्यांचे मत होते. आपल्या पंथाला ते लोकशाही समाजवाद म्हणत. पण धनसाधने सरकारने ताब्यात घेतली पाहिजेत हा आग्रह मात्र त्यांचा कायम होता. अमेरिकेने त्याची जरूर नाही असे दाखवून देऊन जगाला प्रत्यक्ष कृतीने संपत्तीच्या विभजनाचा मार्ग दाखविला. अमेरिकेत जी अर्थव्यवस्था सध्या आहे तिला भांडवलशाहीच म्हणतात पण पन्नास वर्षांपूर्वीची भांडवलशाही व ही नवी भांडवलशाही यांत जमीन- अस्मानाचे अंतर आहे. फायदा, नफा, धन हे एकच ध्येय त्या जुन्या भांडवलशाहीपुढे होते. त्यापायी सैतानाहूनही ती जास्त निर्दय व क्रूर झाली होती. कामगारांचा व एकंदर जनतेचा ती रक्तशोष करीत असे. आताच्या भांडवलशाहीचे फोर्डने म्हटल्याप्रमाणे समाजसेवा हे उद्दिष्ट आहे, पूर्वीच्या युगातले ॲडम स्मिथचे, लेसे-फेअरचे, अनिर्बंध आर्थिक स्वातंत्र्याचे तत्त्व तिने कधीच धिक्कारून टाकले आहे. समाजाच्या एकंदर अर्थव्यवहारावर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे, त्यांत नियोजन असले पाहिजे हे तत्त्व तिने मान्य केले आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला कामगारांनाही वर्गविग्रह, कामगारसत्ता या तत्त्वांचा अवलंब करावा लागला नाही. आणि अशा रीतीने कम्युनिझम तर नव्हेच, पण सोशॅलिझमसुद्धा न स्वीकारता, अमेरिकेने आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. म्हणूनच 'भांडवलशाही' हे नावही आता टाकून द्यावे असा कित्येक लोकांचा आग्रह आहे. ते नाव ठेवावयाचेच असेल तर तिला 'जनतेची भांडवलशाही' म्हणावे असे काही लोकांचे मत आहे.
 हेन्री फोर्डने प्रस्थापिलेली तत्त्वे आता अमेरिकेत सर्वमान्य झाली आहेत. १९४६ साली अमेरिकेत 'रोजगार कायदा' पास झाला. त्या अन्वये जनतेच्या योगक्षेमाची, अन्न, वस्त्र, घर व शिक्षण यांची जवाबदारी सरकारवर कायद्यानेच येऊन पडली आहे. ती पार पाडण्यासाठी सरकारला अर्थव्यवहारात