पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
वैयक्तिक व सामाजिक

चारित्र्य, हा जो धर्म त्याची शक्ती श्रेष्ठतर आहे हे अमेरिकेने धर्मयुद्धे करून सिद्ध केले, व लोकशाहीच्या संरक्षणासाठी एक ढालच जगाच्या हाती दिली.
 भांडवलशहा आणि जनता यांचा हा जो दीर्घकाल संग्राम चालू होता त्यामुळे अमेरिकेत आणखी एक मोठे परिवर्तन घडून आले. अमेरिकन भांडवलदारांना सुबुद्धता प्राप्त झाली. जनता जागृत झाल्यामुळे त्यांच्या धनलोभाला तर आळा पडलाच पण कष्टकरी जनतेला, कामगारांना जास्त वेतन देऊन त्यांची क्रयशक्ती वाढली तर भांडवलाचा त्यात फायदाच आहे, हे हळूहळू त्यांच्या ध्यानात आले आणि त्यामुळे मार्क्सप्रणीत समाजवादाचा अवलंब न करता अमेरिकेला संपत्तीच्या विभजनाचा प्रश्न सोडविता आला. मार्क्सने कम्युनिझमचे तत्त्व सांगताना रक्तपाती क्रांतीवाचून, वर्गविग्रह चेतवून भांडवलदारवर्गाचा नायनाट केल्यावाचून, कामगारांची सत्ता प्रथापित झाल्यावाचून संपत्तीचे न्याय्य विभजन होणे शक्य नाही, असे सांगितले होते. पण अमेरिकन भांडवलदारांनी आपली विवेकदेवता जागृत ठेविल्यामुळे मार्क्सचा हा सिद्धान्त खोटा पडला. अमेरिकेत आर्थिक क्रांती झाली. पण ती शांततेच्या मार्गाने झाली. हेन्री फोर्ड हा त्या क्रांतीचा प्रणेता होय असे काही अर्थवेत्त्यांचे मत आहे. १९१४ साली त्याने कामगारांना २५ रु. रोज वेतन देण्यास प्रारंभ केला व ८ तासांचा कामाचा दिवस ठरविला. त्यामुळे कामगार हा गुलामगिरीतून मुक्त होऊन देशाचा एक सन्मान्य नागरिक झाला. २५ रु. रोज वेतन करण्याचा निश्चय फोर्डने स्वतःहून कसल्याही प्रकारचे बाह्य दडपण नसताना केला होता. त्यामुळे मानवाच्या सद्बुद्धीचा, विवेकशीलतेचा, समाजहिततत्परतेचा तो एक अपूर्व विजय होय असे इतिहासकार मानतात. कामगारांचे शारीराश्रम ही त्याआधी बाजारांतील क्रय-विक्रय करण्याची वस्तू होती. आणि कामगार हा आर्थिक यंत्रातील एक आरा होता. आता तो व्यक्तित्वसंपन्न, स्वतंत्र असा एक नागरिक झाला. जगाच्या इतिहासात ही फार मोठी क्रांती होय.
 संपत्तीचे न्याय्य विभजन व्हावयाचे तर समाजवादाचाच अवलंब केला पाहिजे, असे एक मत २०।२५ वर्षांपूर्वी सर्वत्र रूढ होते. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात ते मूळ धरून आहे. मार्क्सने सांगितलेली रक्तपाती क्रांती