पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैयक्तिक व सामाजिक

कायमचा आधार निर्माण करून द्यावा या दृष्टीने तेथील लोक प्रयत्न करतात. विल्वर फोर्स यानेच रविवारच्या शाळांसाठी, गरिबांच्या मंडळांसाठी हजारो रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत. पण त्यांतून त्याने संस्था निर्माण केल्या व ज्यांना साह्य द्यावयाचें त्यांना काही शाश्वत आधार मिळावा, ते स्वतंत्र व्हावे, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी व्यवस्था त्याने केली. युरोपात जे अनेक धर्मपंथ आहेत त्यांचे कार्य या स्वरूपाचें आहे.
 रुग्णसेवा हे परोपकाराचे केवढे क्षेत्र आहे. व्याधींनी ग्रस्त झालेल्या मनुष्याला तीतून मुक्त करणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. दैवी संपत्तीची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वरांनी हे त्यात एक प्रमुख लक्षण म्हणून समाविष्ट केले आहे. भला वैद्य जो आहे तो रोगावर उपचार करताना 'आपपरू न शोधी'-- शत्रुमित्र पहात नाही हे सात्त्विकतेचे खरे लक्षण होय. अशा या धर्माचरणाच्या बाबतीत पाश्चात्त्यांनी केवढे पुण्य संपादन केले आहे ते पाहिले आणि मग दृष्टी अंतर्मुख करून आपला ज्ञानेश्वरानंतरचा सहासातशे वर्षांचा इतिहास पाहिला म्हणजे आम्ही काही धर्माचरण करतो असे म्हणणे जरा जड जाईल. फॅन्सिस हा बाराव्या शतकाच्या अखेरीस इटालीत मोठा साधुपुरुष होऊन केला. तो श्रीमंताचा मुलगा होता. पण धर्मभावना जागृत होताच अंगावर एक पटकूर घेऊन तो बाहेर पडला. रस्त्यांत त्याला एक महारोगी दिसताच 'आर्ताचेनि वोरसे' त्याचे हृदय भरून आले. महारोग म्हणताच इतके दिवस त्याला धडकी भरत असे. आता सर्व पालटले व त्याने त्या रुग्णाला अक्षरश: मिठी मारली. इतके दिवस श्रीमंत सरदारांच्या सहवासांत तो सुखोपभोग घेत होता. आता दीन, दुःखी, वहिष्कृत यांसी आपुले म्हणविण्यात त्याला सुख लाभू लागले. तो त्या महारोग्याला म्हणाला, 'अरे तू माझा भाऊच आहेस. तुझे दुःख तेच माझे दुःख, तुझे सुख तेच माझे सुख.' असें म्हणून एक-दोन मित्रांसह तो या हतभागी प्राण्याच्या आळीतच राहू लागला व त्यांची सेवा-शुश्रूषा करू लागला. हळहळू त्याच्याभोवती अनुयायी जमू लागले. फ्रॅन्सिस्कन पंथाची स्थापना झाली. आणि या पंथाने जनसेवा हाच धर्म मानून युरोपात मोठमोठी कार्ये केली. दारिद्र्य आणि लोकसेवा हे त्या पंथाचे ब्रीदवाक्य होते.
 १६ व्या शतकापासून ख्रिस्ती मिशनरी 'हे विश्वचि माझे घर' हे महावाक्य डोळ्यापुढे ठेवून जगभर संचार करीत आहेत आणि जेथे जातील