पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६७
अमेरिका : जगाच्या स्वातंत्र्याची ढाल

आपल्या हातातील बाहुली वनविली. 'चाइल्ड लेबर ॲक्ट', 'शेरमन ॲक्ट' असे अनेक जनहिताचे कायदे अमेरिकन काँग्रेसने केले होते. पण ते दप्तरातच पडून राहिले. त्यांचा अंमल करण्याचे सामर्थ्यच सरकारला नव्हते. पोलीस, न्यायालय अशा ठिकाणच्या सरकारी अधिकाराच्या जागेवर दादा लोक परस्पर नेमणुका करीत व मागून अध्यक्षांना कळवीत, आणि ते नेभळे पुरुष त्याला मान्यता देत. त्यामुळे या काळात अमेरिकेत दादांनी नुसता नंगा नाच घातला होता. 'जनतेला आम्ही पायपोसाने मोजतो' असे ते जाहीरपणे लत असत. 'लोकसत्ता', 'अमेरिकेची घटना' यांसारख्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देण्यास त्यांना फुरसत नसे. त्यामुळे अमेरिकेतील शासन हे वॉलस्ट्रीटचे, वॉलस्ट्रीटसाठी व वॉलस्ट्रीटकृत असे होऊन गेले. पण थिओडोर रूझवेल्ट यांनी अध्यक्षपदी येताच वॉलस्ट्रीटला धडा देण्याचे ठरविले व जनहिताच्या कायद्यांचा भराभर अंमल करण्यास सुरुवात केली. निर्भय, स्वार्थातीत व चारित्र्यसंपन्न शास्ता दिसताच जनता त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि मग थोडक्याच अवधीत रूझवेल्ट यांनी दादांची हाडे मोडली. जेव्हा जेव्हा दादा उन्मत्त होत तेव्हा तेव्हा ते जनतेला हाक देत. आणि त्या शक्तीचे उग्र रूप पाहताच दादा विनम्र होत. विड्रो विल्सन यांनी हेच धर्मयुद्ध पुढे चालवून भांडवलशहांना नामोहरम केले आणि फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत एकारलेल्या संपत्तीचा निचरा करण्याचे अनेक कायदे करून त्या उन्मत्त शक्तीला निर्जीव करून टाकले.
 जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट, विल्सन व फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी धनसत्तेशी केलेल्या संग्रामाला वर धर्मयुद्ध म्हटले आहे. हा शब्द (क्रुसेड) अमेरिकन इतिहासकारांनीच वापरला आहे. जेरुसलेम या क्षेत्रासाठी झालेल्या युद्धांना धर्मयुद्धे म्हणतात. पण लोकशाहीच्या रक्षणार्थ केलेल्या या संग्रामाच्या बाबतीत तो शब्द तितकाच, नव्हे, अधिकच सार्थ आहे. कारण लोकशाही हा सर्वश्रेष्ठ धर्म असून त्याच्या रक्षणाला जेरुसलेमच्या रक्षणापेक्षा जास्त महत्त्व आहे. हे युद्ध जिंकून अमेरिकेच्या अध्यक्षांनी लोकशाहीला दिलासा दिलेला आहे. भांडवली सत्ता ही अजिंक्य ठरली असती, तिला नमविणारी दुसरी शक्ती जगात नाही असे ठरले असते तर लोकशाहीचा यापूर्वीच मृत्यू ओढवला असता. पण स्वार्थत्याग, ध्येयनिष्ठा निर्भय वृत्ती, मनोनिग्रह हे जे