पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
वैयक्तिक व सामाजिक

आहेत. स्वातंत्र्ययुद्धाचे हे विपरीत पर्यवसान पाहून अमेरिकन नागरिक अगदी हतबुद्ध होऊन गेले. कारण हे नवे दास्य फार भयानक होते. ज्या जनतेच्या साह्याने भांडवलाशी लढावयाचे त्या जनतेलाच भांडवलशहा वश करीत. ज्या वृत्तपत्रातून लोकजागृती करावयाची ती वृत्तपत्रेच त्यांची गुलाम होत. लोकसभा, न्यायपीठे, यांची हीच अवस्था होऊन गेली. राजा उन्मत्त झाला तर त्याला पदच्युत करता येते, फाशी देता येते पण येथे कोणाला फाशी द्यावयाचे? जनतेला ? म्हणजे स्वतःलाच ?
 लोकसत्तेपुढे हा अत्यंत विचित्र पेच येऊन पडला होता. लोकांची मते, लोकसभा, वृत्तपत्रे, न्यायपीठे ही खरी लोकशाहीची शस्त्रास्त्रे. पण हीच शत्रूने काबीज केल्यावर त्याच्याशी कोणच्या शस्त्राने लढावयाचे ? लढा करता आला नाही तर लोकसत्ता ही कल्पनाच जगातून नष्ट होईल ! हा विचित्र पेच सोडवावयाचा कसा ? भांडवली शक्तीशी कोणत्या शक्तीच्या साह्याने मुकाबला करावयाचा ?
 'चारित्र्य' ही ती शक्ती होय हे या प्रश्नाला अमेरिकेने दिलेले उत्तर आहे. धनमोहातीत, नीतिभ्रष्ट, चारित्र्यसंपन्न अशी एक व्यक्ती निर्भयपणे धनसत्तेशी सामना करण्यास उभी राहताच जनतेच्या विवेकबुद्धीवरचे मालिन्य नष्ट होते, ती जागृत होते आणि तिच्या ठायी जी महाशक्ती निर्माण होते ती कोणच्याही सत्तेला सहज नमवू शकते, हा सिद्धान्त अमेरिकेच्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील पानापानावर लिहिलेला आहे.
 थॉमस जेफरसन यांनीच या लढ्याला प्रारंभ केला. ते निवडणुकीस उभे राहिले त्या वेळी धनशहांनी वृत्तपत्रांचे सर्व सामर्थ्य त्यांच्याविरुद्ध उभे केले होते. पण या चारित्र्यसंपन्न पुरुषाचा पराभव करण्यास ते असमर्थ ठरले. आणि हेच पुढे थिओडोर रूझवेल्ट (१९००-१९०८), विड्रो विल्सन (१९१२-२०) व फ्रँकलिन रूझवेल्ट (१९३२-४६) यांच्या वेळी दिसून आले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भांडवलशहा अत्यंत उन्मत्त झाले होते. निरनिराळ्या कारखान्यांनी व कंपन्यांनी आपले संघ करून मुक्तस्पर्धा हे भांडवली अर्थव्यवस्थेतील मुख्य तत्त्वच नष्ट करून टाकले आणि मग वाटेल ती भाववाढ करून जनतेच्या रक्ताचे जळवांसारखे शोषण चालविले. क्लीव्हलँड, मक्किन्ले हे अध्यक्ष अगदी दुबळे होते. त्यांना राजकीय दादांनी