पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'मेरिका हे जगाचे आशास्थान आहे' असे आत्मविश्वासाचे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष थॉमस जेफरसन (१८०० - १८०८) यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात काढले होते. आज त्यांचे वचन अक्षरशः खरे ठरले आहे. अमेरिकेच्या अभावी व्यक्तिस्वातंत्र्य, समता, लोकसत्ता यांचा जगातून बहुधा लोपच झाला असता, आणि आजच्या जगाचे चित्र आतापेक्षा फारच निराळे दिसले असते. दंडसत्तेच्या काळया घनदाट छायेतच जग आपल्याला आज पाहावे लागले असते. पण लोकसत्ता ही इतर सर्व सत्तांहून जास्त बलाढ्य व समर्थ असते हे अमेरिकेने सिद्ध करून दाखवून जगावरची ती महान् आपत्ती निस्तरून टाकली आहे. अमेरिकेच्या या यशाचे रहस्य काय त्याचा येथे विचार करावयाचा आहे.
 औद्योगिक क्रांतीनंतर जी भांडवलशाही जन्माला आली तिची अमेरिकेत अत्यंत वेगाने वाढ झाली. अल्पावधीतच तिने फार प्रचंड रूप धारण केले आणि देशातल्या नागरिकांच्या जीवनावर आपली सत्ता प्रस्थापित केली. व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, प्रजासत्ताक हे शब्द तिने शून्यवत् करून टाकले. पैशाच्या जोरावर भांडवलशहा मते विकत घेत, वृत्तपत्रे विकत घेत आणि सीनेट हाऊस ही विधिमंडळेहि विकत घेऊन या योगे हाती येणाऱ्या निरंकुश सत्तेच्या जोरावर जनतेचा रक्तशोष करीत. लवकरच भांडवलशाहीइतकी क्रूर, स्वार्थी, सैतानी, सत्ता जगात दुसरी नाही हे अमेरिकन लोकांना दिसून आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी आपले रक्त सांडले होते त्यांच्या लवकरच ध्यानात आले की आपण राजकीय दास्यातून मुक्त झालो असलो तरी आर्थिक दास्याच्या शृंखला आपल्या पायांवर अधिकच करकचून आवळून बसल्या