पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
वैयक्तिक व सामाजिक

यात आहे. मनोनिग्रह, संयम हा स्वतःचा स्वतःला शिकवता येतो. ध्येयवाद अंगीकारणे ही स्वाधीन कला आहे. ही स्वाधीन धनदौलत आहे. आणि हे धन प्रत्यक्ष भांडवलापेक्षा श्रेष्ठ आहे. चारित्र्य या धनातून आर्थिक भांडवल सहज निर्माण होते. पण ते जर नसेल तर आर्थिक भांडवल कितीही असले तरी ते नष्ट होते. वेदव्यास म्हणतात,

अर्थानामीश्वरो यः स्यादिंद्रियाणामनीश्वरः ।
इंद्रियाणामनैश्वर्याद् ऐश्वर्याद् भ्रश्यते हि सः ॥

 'जो मनुष्य धनाचा स्वामी असून इंद्रियांचा दास असतो तो त्या इंद्रियांच्या दावामुळे धनैश्वर्यापासून भ्रष्ट होतो.' (महाभारत ५.३४.६३)
  भारताच्या तरुण पिढीने या व्यासवचनाचे चांगले अध्ययन केले तर स्वाधीन असलेले इंद्रियांचे स्वामित्व- म्हणजेच त्याग, ध्येयवाद किंवा चारित्र्य त्यांना प्राप्त होईल आणि मग धनाचे, समृद्धीचे स्वामित्वहि सुलभ होऊन या भूमीवर येऊ घातलेले भयंकर संकट आपल्याला सहज टाळता येईल. व्यक्तित्व, स्वातंत्र्य, यांची अभिरुची आमच्या विद्यार्थ्यांच्या अंगी कितपत आहे यावर हे सर्व अवलंबून आहे. ही अभिरुची असली तर आपल्या अधःपाताची सर्व जबाबदारी परिस्थितीवर टाकून ते मोकळे होणार नाहीत आणि 'स्वाधीन' होण्याचा मार्ग स्वीकारतील असे वाटते.