पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यामुळे ज्या जळत्या नंदादीपापासून लोकांनी आपल्या ठायीच्या ज्योती प्रदीप्त करावयाच्या तोच विझला असे होऊन सर्वत्र अंधार पडतो, आणि लोक खालच्या पातळीवर घसरतात. भारतामध्ये टिळक, महात्माजी यांनी पेटविलेला वन्ही स्वातंत्र्यप्राप्तीबरोवर विझून गेला. नियमाप्रमाणे सत्तारूढ नेते सनातनी झाले आणि जनतेचे रक्त थंड झाले.
 पण आपण लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. मानवतेचे हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजेत असा आपला आग्रह आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचे श्रेष्ठ सुख प्रत्येकाला प्राप्त करून देऊ अशी आपली प्रतिज्ञा आहे. तिची पूर्ती आपणास करायची तर रक्त थंड असतानाच त्याग करण्याची शिकवण आपण स्वतःला दिली पाहिजे. शांततेच्या काळची ध्येये नाट्यमय, तेजाने झगझगणारी, विद्युल्लतेप्रमाणे लखलखणारी अशी नसतात हे खरे आहे. पण केवळ संग्रामातील विजयांनी मानवी जीवनाची परिपूर्ती होत नसते हे जाणण्याची रसिकता आपल्या ठायी आपण निर्मिली पाहिजे. सर्वांना अन्नवस्त्र मिळाले तरच 'मानवता' या शब्दाला अर्थ आहे. सर्वांना शिक्षण मिळाले तरच मनोविकास, मतस्वातंत्र्य, व्यक्तित्व या कल्पना साकार होतात. हे जाणण्याइतकी बुद्धीची प्रगल्भता आपल्या समाजात आली पाहिजे आणि मुख्य म्हणजे बुद्धीने, विवेकाने दिलेली प्रेरणा आपल्याला त्यागाला प्रवृत्त करण्यास समर्थ होईल अशी आपली मनोवृत्ती झाली पाहिजे. जीवांच्या संहारापेक्षा जीवांचा प्रतिपाल हे ध्येय जास्त रम्य, जास्त विलोभनीय वाटण्याइतकी श्रेष्ठ अभिरुची आपण जोपासिली तरच आपली लोकशाही यशस्वी होईल. नाहीतर लवकरच या भूमीत जुगारीच्या अड्डयांचे प्रमुख, चोरट्या दारूच्या व्यापाराचे बादशहा, सट्टेबाजीत पारंगत झालेले थैलीशहा, मोठी संघटना करून बँका, पेढ्या भर दिवसा लुटणारे प्रतिष्ठित पेंढारी यांचे साम्राज्य प्रस्थापित होईल.
 येवढ्या मोठ्या पाशवी शक्तीशी संग्राम करण्याइतके समर्थ चारित्र्य निर्माण करणे ही गोष्ट दुष्कर तर खरीच. पण एका दृष्टीने ती सुकर आहे. धनधान्य, भांडवल परदेशातून आणता येते हे खरे, पण ते काही झाले तरी परावलंबनच होय. चारित्र्याचे धन हे स्वायत्त आहे, मदायत्त आहे. कोणच्याही परिस्थितीत अंतरात्म्याला आवाहन करून हे धन प्राप्त करून घेता येते. हे मानवाला मिळालेले सर्वात मोठे वरप्रदान होय. मानवाचे मानवत्वच मुळी