पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत. पराक्रम करीत. त्यांचे कर्तृत्व बहरून येई. ज्यांनी धर्मासाठी, सामाजिक व राजकीय क्रांतीसाठी किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी संग्राम केले नाहीत ते समाज लोकांचे चारित्र्य संवर्धन करू शकले नाहीत. समाजाला ध्येयवाद, त्याग, मनोनिग्रह शिकवू शकले नाहीत. शांततेच्या काळी मनुष्याला स्वार्थाचा, सुखाविलासाचा, क्षुद्र आपपरभावाचा त्याग करण्यास शिकविण्याची किमया अजून फारशी कोणाला साधलेली नाही.
 संग्रामकालात मनुष्य जो त्याग करतो तो भावनेच्या भरात काही एका आवेगात आणि थोड्या बेभान अवस्थेतच करतो. रक्त तापलेले आहे, राग- द्वेष उत्कट झालेले आहेत, मनाचा प्रक्षोभ झालेला आहे, अशा वेळी मनुष्य यातना सोसू शकतो. स्वतःची क्षुद्रता विसरून क्षणभर तो उदात्त भूमीवर आरोहण करतो आणि त्यामुळे देहदंड आनंदाने सोसण्याची त्याच्या मनाची तयारी झालेली असते. शांततेच्या काळात या प्रेरणा नष्ट झालेल्या असतात. शांततेच्या काळची ध्येये वास्तविक तितकीच उदात्त असतात. सर्व राष्ट्राला पुरेसे अन्नधान्य निर्माण करणे, प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, घर, आणि शिक्षण हक्काने मिळण्याची सोय करणे, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून सर्वत्र समता प्रथापित करणे, अमाप धन निर्माण करून प्रत्येकाला साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, शिल्प इ. कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळवून देणे ही ध्येये खरोखरी फार उदात्त आहेत. राष्ट्रीय संग्राम करावयाचे ते यासाठीच करावयाचे असतात. पण ही ध्येये बुद्धिगम्य आहेत. भावनांना त्वरित आवाहन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नाही. ती रक्तात प्रक्षोभ निर्माण करीत नाहीत आणि भावनांच्या ठायी मनुष्याला कार्यप्रवण करण्याची शक्ती असते तशी बुद्धीच्या ठायी नसते. बुद्धी हिशेब करीत असते आणि हिशेबातून त्यागाची प्रेरणा कधीच निर्माण होत नाही. म्हणूनच क्रान्तीचा, संग्रामाचा ताण ढिला पडला की माणसे गळाठतात. त्यांचे रक्त थंड होते आणि मग वासनांवर जय मिळवण्याची त्यांच्या ठायी काही काळ आलेली शक्ती नष्ट होते. सामान्य माणसांप्रमाणेच नेत्यांचेही असेच अवस्थांतर होते. क्रान्ती होईपर्यंत नेते क्रांतिकारक वृत्तीचे असतात. पण ती संपताच ते सत्तारूढ झाल्यामुळे सनातनी आणि प्रतिगामी होतात. (इंग्लिश इतिहासकार ट्रिव्हेलियन याने क्रॉमवेलच्या चरित्राची मीमांसा करताना या सिद्धान्ताचे सुरेख विवेचन केले आहे.)