पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६१
आपल्या लोकशाहीवरील नवे संकट

मूळ अधिकार विद्यापीठांचा; तेथील प्राध्यापकांचा आणि एकंदर शिक्षकवर्गाचा ! पण बनारस, शांतिनिकेन, आग्रा, मुंबई या विद्यापीठांची कहाणी नुकतीच वर्तमानपत्रांतून आली आहे. त्यावरून स्वतःच चारित्र्यशून्य असलेली ही विद्यापीठे विद्यार्थ्यांना कोणचे वळण लावणार हे दिसतेच आहे. अनेक वेळा या सर्वांना बाजूस सारून स्वतः विद्यार्थीवर्गच आत्मस्फूर्तीने स्वतःच्या ठायी स्वतःच ध्येयवादाचे, थोर आकांक्षांचे, श्रद्धांचे बीजारोपण करू शकतो. पण तीही आशा भारतातील विद्यार्थ्यांकडून धरता येत नाही. त्यांचे काय चरित्र आहे याचे वर्णन आरंभी केलेच आहे. अशा रीतीने येथे सर्व शून्याकार आहे. आणि व्यापार, कारखानदारी, धरणयोजना, विकासयोजना यांसाठी तूट पडली तर अवश्य ते भांडवल परक्या देशांतून आणता येते तसे हे चारित्र्यरूप भांडवल आणता येत नसल्यामुळे आपली समस्या अगदी बिनतोड होऊन वसली आहे.
 चारित्र्यसंवर्धनाचा ऐतिहासिक दृष्टीने आपण विचार केला तर आपली ही समस्या दिसते यापेक्षा शतपट विकट आहे हे आपल्या ध्यानात येईल. जगातल्या कोणच्याही देशाचा इतिहास पाहिला तर असे दिसते की ज्यात प्राणपणाने लढणे अवश्य आहे असा घोर समरप्रसंग जेव्हा लोकांच्या डोळ्यापुढे असतो तेव्हाच ते त्यागाला, शारीरिक वा मानसिक यातना सोसण्याला, देहदंडाला, आत्मबलिदानाला सिद्ध होतात. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, युद्धाचा प्रसंग आहे, अन्य राष्ट्रीय लढ्याचा प्रसंग आहे अशा वेळी सामान्य जनांचेही धैर्यशौर्यादि गुण, त्याग हे प्रगट होतात, विकसित होतात. शांततेच्या काळी लोकांमध्ये ध्येयवाद टिकवून धरणे, त्यांना त्यागाला प्रवृत्त करणे, सुखभोगापासून परावृत्त करणे ही गोष्ट फार कठिण; कल्पनेच्या बाहेर कठिण आहे. ही गोष्ट इंग्लंडलाच आजपर्यंतच्या इतिहासात जमली आहे. अन्यत्र नाही. गेल्या शतकात जर्मनी, इटली, जपान, चीन या देशांत राष्ट्रसंघटना झाली. या सर्व संघटना राष्ट्रीय आपत्तीच्या काळी, त्या वेळी झालेल्या युद्धाच्या आगीतून निर्माण झालेल्या आहेत. त्याच्या आधीच्या शतकात नेपोलियने फ्रान्सचे वैभव वाढविले, वॉशिंग्टनने अमेरिकेचे कर्तृत्व उदयास आणले ते सर्व क्रांतीच्या संग्रामातून निर्माण झालेल्या अग्निज्वाळांच्या साहाय्याने. त्याच्या आधी मोठमोठे धर्मसंग्राम होत. त्या वेळी माणसे जिवंत
 वै. सा.... ११