पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
वैयक्तिक व सामाजिक

राष्ट्रीयीकरण ही फारच मोठी आपत्ती आहे हे आपण कधीही विसरू नये.
 तेव्हा चारित्र्यधनाची वाढ करणे हा एकच उपाय सर्व आपत्तींवर आहे. आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या धनाला ओहोटी लागून आपली गंगाजळी आता जवळजवळ रिती झालेली आहे. १९४९ च्या बंगलोरच्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेलांनी अत्यंत तीव्र शब्दांत काँग्रेसजनांना हेच कटु सत्य सांगितले होते. 'स्वातंत्र्यापूर्वी आपण ध्येयवादी होतो, त्यागी होतो. पण आता आपली नीती फारच खालावली आहे. इतरांप्रमाणेच काँग्रेसजनही भ्रष्ट झाले आहेत,' असे ते म्हणाले; त्याच साली मद्रासला केलेल्या भाषणात अतिशय निराशेने ते म्हणाले होते, 'आपल्याला आता बाहेरून संकट येणार नाही. आले तर ते आतूनच येणार आहे. आपण इतके चारित्र्यभ्रष्ट आहोत की, लवकरच याचे आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागतील.' दुर्दैवाने सरदारजींची भीती आज खरी ठरली आहे. आणि यापेक्षाही दुसरे जास्त भयंकर सत्य यातून स्पष्ट झाले आहे. ते हे की या देशाला ध्येयवाद शिकवील, नीतिमार्गावर आणील, चारित्र्यसंपन्न करील असा सामर्थ्य संपन्न एकही पुरुष येथे आता नाही. पंडित नेहरू, राजेंद्रबाबू, पंत यांसारखे थोर नेते आज दहा वर्षे जनतेला व काँग्रेसजनांना नीत्युपदेश करीत आहेत. पट्टाभि, ढेबरभाई यांसारखे काँग्रेसचे अध्यक्ष कंठरवाने तेच सांगत आहेत. पण देशाच्या चारित्र्याची पातळी वर न जाता खालीच चालली आहे.
 आपल्यापुढची समस्या किती बिकट आहे याची काहीशी कल्पना वाचकांना आली असेल. चारित्र्यधन जर आपण आता प्राप्त करून घेतले नाही तर अमेरिकेप्रमाणे येथे ठग-पेंढारशाही सुरू होईल. आणि तिने केलेला रक्तशोष सोसण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी मुळीच नाही. चारित्र्यधन हे इतर धनाप्रमाणे आयात करता येत नाही. ते मानवाच्या चित्तांतच प्रगट व्हावे लागते. आणि ही भूमी तर सध्या येथे अगदी नापीक झाली आहे. ! काँग्रेसकडे देशाचे नेतृत्व आहे. तिची काय स्थिती आहे ते वर सांगितलेच. विरोधी पक्षाचे या बाबतीतले दारिद्र्य तर जास्तच केविलवाणे आहे. त्यांच्यातील हेवेदावे, गटबाजी, फुटीरपणा, क्षुद्र कारणावरून होणारी लाथाळी ही सर्व अगदी घृणास्पद आहे. ध्येयवाद, चारित्र्य, सच्छील शिकविण्याचा