पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपल्या देशावर नजीकच्या भविष्यकाळात ओढवणारे हे जे भयंकर संकट त्याची जाणीव पुष्कळ विचारवंतांना झालेली असल्यामुळे ते आपापल्या- परीने त्यावर उपायही सुचवीत आहेत. आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या मते पक्षपद्धतीच अजिबात नष्ट केली म्हणजे तिच्यामुळे उद्भवलेले अनर्थही टळतील. पण एकतर पद्धती नष्ट करून तिच्या जागी दुसरी कोणची आणावयाची याचे व्यावहारिक भूमिकेवरून या दोघांपैकी कोणीच उत्तर दिलेले नाही आणि दुसरे म्हणजे जोपर्यंत कोणचीही पद्धती शेवटी मनुष्याच्याच हातात राहणार आहे तोपर्यंत नुसत्या पद्धतीत बदल करून काहीच उपयोग होणार नाही. स्वार्थी, हृदयशून्य, चारित्र्यहीन मनुष्य कोणच्याही शासनपद्धतीतून, कोणच्याही समाजरचनेतून वाटेल ते अनर्थ घडवू शकतो हे इतिहासात पावलोपावली आपल्याला दिसून येत आहे तोपर्यंत या दोन थोर नेत्यांच्या सूचनेचा विचारसुद्धा करता येणार नाही. ठग- पेंढारशाही पक्षनिष्ठ राजकारणाशी निगडित आहे तशीच ती भांडवलशाहीशी निगडित आहे. तेव्हा भांडवलशाही नष्ट करावी म्हणजे सगळया अनर्थाचे मूळच नष्ट होईल असे म्हणणारा एक पक्ष आहे. आणि हा पक्ष फारच मोठा आहे. त्याचे मत असे की भांडवलाने उभारलेल्या सर्व उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करून टाकावे म्हणजे पुढील अनर्थपरंपरा टळतील. पण हाही विचार वरच्यासारखाच भोळा व सात्त्विक आहे. राष्ट्रीयीकरण म्हणजे उद्योगधंदे राष्ट्राच्या ताब्यात देणे. म्हणजे कोणाच्या ? तर सरकारच्या. आणि सरकारच्या म्हणजे कोणाच्या ? तर निवडून दिलेले जे मंत्री त्यांच्या. त्यांच्याच कारभारावर पब्लिक अकौंट्स कमिटी व इतर तपासनीस कसा प्रकाश टाकीत आहेत हे वर सांगितलेच आहे. आणि विमाकंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणाने वर सांगितलेल्या विचाराचा आदर्श पाठ आपल्याला दिलाच आहे. तेव्हा याचाही निष्कर्ष हाच की नुसती जडयंत्रणा बदलणे याला काहीच अर्थ नाही. धरणयोजना, ग्रामविकासयोजना, कृषि- पुनर्घटना, राष्ट्रविकास योजना, वनमहोत्सव या सगळ्या सरकारीच योजना आहेत. म्हणजे त्यांचे राष्ट्रीयीकरणच झाले आहे. त्यांची काय अवस्था आहे ते आपण पाहातच आहो. तीच अवस्था सर्वं उद्योगधंद्याच्या राष्ट्रीयीकरणामुळे प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. मानवाची नीती व चारित्र्य यांची पातळी वाढली नाही तोपर्यंत