पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
वैयक्तिक व सामाजिक

असद् विवेकशक्ती नाही असे म्हटल्यासारखे होईल. ही मानवजातीची हत्या आहे. मानव मोह जिंकू शकतो यातच त्याचे मानवत्व आहे. म्हणूनच सध्याच्या समाजातले श्रमाविना पैसा, हरामी पैसा हे तत्त्वज्ञान खणून काढून नव्या पिढीला चारित्र्याचे शिक्षण दिले पाहिजे असे अमेरिकन शास्त्रज्ञ सांगत आहेत. अर्थव्यवस्था नीतीच्या अधीन असली तरच त्या गुन्हेगारीला नियंत्रित करता येईल असे त्यांना वाटते.
 आपल्याकडे ही अद्ययावत् गुन्हेगारी हळूहळू वाढत आहे याविषयी कोणाचे दुमत आहे असे दिसत नाही. खेडेगावातील ग्रामपंचायतीपासून प्रदेशातील विधान- सभेपर्यंत सर्वत्र 'दादांचे' राज्य सध्या चालू आहे, असे सर्व पक्षाचे लोक, अपक्ष लोक, विद्वान्, अविद्वान् सर्वच म्हणत आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसपक्षातील लोकांनी स्वतःच्याच मंत्रिमंडळाला हैराण करण्याचा डाव मांडला आहे. सरकारने मांडलेल्या ठरावाला आम्ही विरोध करू, असे त्यांनी मुख्य मंत्र्याला बजावले आहे. यामागे मागल्या निवडणुकांत पडलेल्या मोठ्या दादांचा हात आहे असे जाहीरपणे सांगितले जात आहे. पंजाब, कर्नाटक, ओरिसा येथल्या मंत्रिमंडळांतील गटबाजीचे वर्णन काँग्रेसश्रेष्ठीच नित्य करीत आहेत. गटबाजीचा अर्थ एकच होतो. राज्यकारभारात तत्त्वनिष्ठेचा संबंध राहिला नसून, कारस्थानी, पाताळयंत्री, बळदंड माणसांचे तेथे राज्य आहे असा तो अर्थ होय. यातून पुढले सगळे अर्थ उद्भवत असतात. पब्लिक अकौंट्स कमिटी, गोरावालासारखे सरकारने नेमलेले तपासनीस यांनी सादर केलेल्या अहवालावरून हे अनर्थ कोणच्या सीमेपर्यंत गेले आहेत याची कल्पना येते. जनतेच्या पैशाचा अपहार करण्याच्या या वृत्तीतूनच पुढे गुंडराज्य निर्माण होते. कारण सुखासुखी हा अपहार कोणीच पचू देत नाही. यासाठी मग ठग- पेंढाऱ्यांच्या सेना तयार ठेवाव्या लागतात आणि हळूहळू मग तेही आपली संघटना निर्माण करून राजकारण व राजकारणी यांना ताब्यात घेतात. पक्षनिष्ठ राजकारणामुळे दोन्ही पक्षांना ठग पेंढाऱ्यांचे साह्य घ्यावे लागते. भारतात काँग्रेसशी सामना देईल असा पक्ष नसल्यामुळे इतके दिवस याला थोडा आळा पडला होता. पण आता काँग्रेसमध्येच प्रत्येक प्रदेशराज्यात तट पडल्यामुळे आणि ते तट एकमेकांशी भिन्नपक्षांच्या अहिनकुल- न्यायानेच वागत असल्यामुळे अधोगतीला फारसा वेळ लागणार नाही.