पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५७
आपल्या लोकशाहीवरील नवे संकट

हा अतिरेक होत नाही. समाजात काही प्रमाणात जरी अशी निःस्पृह माणसे असली तरी ही आपत्ती टळते. इंग्लंडने ही किती तरी प्रमाणात टाळली आहे. बार्नेसनेच ही तुलना केली आहे. तो म्हणतो, "कायदा पाळण्याची ब्रिटिश जनतेची वृत्ती प्रशंसनीय आहे. त्यामुळे लोकमत तेथे जास्त प्रभावी आहे. म्हणजेच राजकारणी लोक इतके भ्रष्ट नाहीत. अमेरिकेच्या तुलनेने सट्टेबाजीचा रोग ब्रिटनमध्ये फार कमी आहे. स्वार्थाला धनिक लोक तेथे काही तरी आळा घालू शकतात असा याचा अर्थ आहे. गेल्या दोनशे वर्षांत इंग्लंडमध्ये बँका गडगडल्याचे उदाहरण नाही. असले तर अगदी तुरळक. याचा अर्थ काय ? सट्टेबाजीचा, हरामाच्या पैशाचा मोह इंग्लंडमधले लोक जिंकू शकतात हा त्याचा अर्थ आहे. सामाजिक वा आर्थिक परिस्थितीला महत्त्व नाही असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. पण मानवाची चारित्र्यशक्ती, मानवाचा धर्म हाच अंतिम निर्णायक आहे हे आपण विसरून चालणार नाही. गेल्या तीनशे वर्षांत इंग्लंडमध्ये रक्तपाती क्रांती झाली नाही आणि सर्व प्रकारची आर्थिक समता मात्र बऱ्याच अंशाने प्रस्थापित झाली आहे. हे तरी फल कशाचे ? तेथील सत्ताधिकारी, तेथील धनशहा हे विवेकी आहेत, बुद्धिवश आहेत, सत्ता व धन यांचा लोभ मर्यादित केला पाहिजे हे ते जाणतात आणि तसा करू शकतात यामुळेच हे अनर्थ टळले आहेत. मानव स्वभावतःच सत्प्रवृत्त वा पापप्रवृत्त असतो यांपैकी कोणतेच मत इतिहाससिद्ध नाही. पण त्याच्या पापाची सर्व जिम्मेदारी परिस्थितीवर ढकलणे हे अगदी आत्मघातकीपणाचे आहे. पण अलीकडे आपल्याकडे हे मत प्रबळ होत आहे असे वाटते. नाटक, कादंबरी, लघुकथा या ललितसाहित्यात तर चोर, दरोडेखोर, खुनी, यांना मोठ्या नाट्यमय पद्धतीने पापाच्या जबाबदारीतून मुक्त केलेले असते. या गुन्हेगाराला पकडले आणि 'तू वाममार्गी का झालास ?' असे विचारले तर 'ते समाजाला विचारा' असे तो मोठ्या रुबाबात उत्तर देतो. परिस्थिती वा समाज पापप्रवृत्तीला जबाबदार आहे असे शास्त्रज्ञांनी म्हणणे निराळे आणि गुन्हेगाराने म्हणणे निराळे. अंतःस्थ निग्रहशक्ती, संयम, विवेक ही मानवाच्या हातची अमोघ शक्ती आहे. त्या शक्तीच्या जोरावर तो परिस्थितीवर मात करू शकतो. व्यक्ती स्वतःच आपली पापे परिस्थितीवर लादू लागली तर मानव हे एक जडयंत्र आहे, तो अचेतन आहे, त्याला सद्-