पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
वैयक्तिक व सामाजिक

१९४० सालापासून या रोगांवर रामबाण औषधे सापडली आहेत. पण हा रोग उत्तरोत्तर वाढतच आहे. या रोग्यांतील शेकडा ६० लोक १५ ते २५ या वयाचे असतात. तरुण स्त्रीपुरुषांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल हे सांगणे नकोच. अमेरिकेत मादकद्रव्यसेवनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणांत ते प्रमाण इतके वाढत आहे की ते पाहून समाजशास्त्रज्ञांना धक्का बसतो. अमेरिकेत अफू, कोकेन व इतर मादक द्रव्यांवर (यांत मद्य नाही. ते निराळेच आहे.) १४०० कोटी रुपये दरसाल खर्च होतात. या व्यसनाबरोबर अमेरिकेत आत्महत्येचेही प्रमाण असेच वाढत आहे. यामुळे अमेरिकेतही या सर्व आपत्तींना तोंड देणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. मग आपल्याकडे काय होईल, सध्याच काय होत असेल याची कल्पना करता येईल. युद्धाची जशी सर्व आधुनिक शस्त्रास्त्रे अमेरिकेत सिद्ध आहेत आणि त्यासाठी लागणारे धनही आहे त्याचप्रमाणे या आपत्तींशी लढा देण्यास लागणारी साधनसामुग्री, पैसा हाही तेथे आहे. पण आपल्याजवळ त्यातले काहीच नाही. आणि या घोर आपत्ती मात्र आपल्याकडे वेगाने चालून येत आहेत.
 या सर्व आपत्तींना तोंड देण्यासाठी, या प्रतिष्ठित पेंढारवृत्तीला आळा घालण्यासाठी अमेरिकन शास्त्रज्ञ कोणचा उपाय सुचवितात ? चारित्र्य ! समाजातील तरुणांना नीतीचे, चारित्र्याचे, उदात्त ध्येयवादाचे, मनोनिग्रहाचे शिक्षण दिले पाहिजे. यालाच जुन्या काळी धर्म असे म्हणत. पण धर्मसंस्था ज्यांच्या हाती होत्या आणि आहेत त्यांनी धर्माला अत्यंत जड, कर्मठ, विपरीत व ओंगळ रूप आणून ठेविले आहे. म्हणून अलीकडे तो शब्द चटकन् कोणी वापरीत नाही. वास्तविक मनोनिग्रह, त्याग, जनसेवा, नीतिधैर्य, ध्येयवाद, सत्यनिष्ठा, परमेश्वरावरील श्रद्धा, कुटुंबनीति, हाच खरा धर्म होय. आणि हा धर्म म्हणजेच- नव्या भाषेत ही मूल्ये अमेरिकेतून नष्ट होत चालली आहेत. फायनॅन्स कॅपिटॅलिझम्, प्रतिष्ठित ठगपेंढारशाही, व कुटिल नीतिभ्रष्ट राजकारण यांतूनच निर्माण झाले आहे हे खरे. पण याचाही सूक्ष्म विचार केला तर हा वाद बीज आणि वृक्ष यांच्यासारखा आहे असे दिसेल. भांडवलशाहीचा अतिरेक तरी स्वार्थाच्या अतिरेकामुळेच होतो. माणूस संयमी असला, म्हणजे वरील अर्थाने धर्मनिष्ठ असला, त्याची नीतिमूल्ये दृढ असली तर