पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५५
आपल्या लोकशाहीवरील नवे संकट

सामर्थ्य थोडेतरी जनतेत आहे. या पेंढारशाहीला आळा घालण्याचे नवे नवे उपाय शोधून काढण्यात मधून मधून तेथे लोक यशस्वी होतात. गुन्हेगारीच्या शोधासाठी, तिच्या बंदोबस्तासाठी, तुरुंग, पोलीस, गुप्तपोलीस, न्यायालये, सरकारी वकील यांसाठी अमेरिकेत दरसाल १५ शे कोटी- म्हणजे सर्व भारताच्या अर्थसंकल्पाइतके– रुपये खर्च होतात. तेथे एका जनरल मोटर्स या कंपनीचे भांडवलच भारताच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पाएवढे आहे. म्हणून प्रतिष्ठित मवालीगिरीने केलेली लूटमार काही काळ तरी तेथे जनतेला सोसणे शक्य आहे. हेही दिवसेंदिवस फारच कठीण होत चालले आहे हे खरे. आपल्याला माहित आहे की अमेरिकेत वेड्या माणसांचे प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे. या पेंढारशाहीमुळे अनेक ठिकाणी समाजरचना उद्ध्वस्त होत आहे; लोकांच्या मनावर निराशेचा, विफलतेचा पगडा बसत आहे आणि त्यामुळे मनोदौर्बल्य कमालीच्या वेगाने वाढत आहे. १९५१ साली अमेरिकेत १ लक्ष ७० हजार वेडे वा मनोभ्रंश झालेले लोक होते व बार्नेसने दिलेल्या माहितीप्रमाणे ही संख्या शे. ४ या प्रमाणात वाढत आहे. आज जी १५ वर्षांची मुले आहेत त्यांच्यातून दर विसांपैकी १ वेडा होणार असे तज्ज्ञांचे भविष्य आहे. अमेरिकेत विवाहसंस्थाही भग्न होत आहे. दर तीन विवाहांपैकी एकाचा तेथे विच्छेद होतो. आणि पुढील १०।२० वर्षांत ते प्रमाण एकास एक असे होईल अशी समाजशास्त्रज्ञांना भीति आहे. याला अनेक कारणे आहेत. पण गुंडमवाल्यांची चलती- त्यांची सत्ता- त्यांचे अधिराज्य हे एक निश्चित आहे. प्रतिष्ठित ठगांच्या अनेक धंद्यांपैकी जुगारी हा फार मोठा धंदा आहे. अमेरिकेत कारखानदारी चालत नसेल इतक्या मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय चालतो. याच्याही मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स, सिंडिकेट्स आहेत. त्यांचेही कारभार मागे सांगितल्याप्रमाणे शहराच्या श्रीमंत भागातून चालतात. याचा संसारावर, कुटुंबव्यवस्थेवर व विवाहसंस्थेवर केवढा परिणाम होत असेल हे सहज ध्यानात येईल. शेकडो संसार यामुळे क्षणाक्षणाला उद्ध्वस्त होत असतात. आणि त्यामुळे पुन्हा गुन्हेगारी आणि मनोदौर्बल्य वाढत जाते. विवाहसंस्था व वैवाहिक नीती खालावत चालली म्हणजे सिफिलिस, गनोरिया अशा गुप्तरोगांचे प्रमाण वाढत जाते. कार्ल वॉरन् या पंडिताच्या मते अमेरिकेत या रोगांनी दोन कोटी लोक ग्रस्त आहेत. आश्चर्य असे की