पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
वैयक्तिक व सामाजिक

चालू आहे. म्हणून सध्याची आर्थिक व राजकीय घडी बदलून समाजाची पुनर्घटना केली पाहिजे.
 अमेरिकेतील वाढती नीतिभ्रष्टता, वाढती गुन्हेगारी यांचे वर्णन वर दिले आहे. तज्ज्ञांनी तिची केलेली कारणमीमांसा आणि सुचविलेले उपाय हेही वर दिले आहेत. त्याच्या आधी प्रारंभी आपल्या देशातील आयंगार, सुब्रह्मण्यम्, शिवन्गौडा, मुदलियार यांनी आपल्या देशातल्या गुन्हेगारीची केलेली वर्णने व मीमांसाहि दिली आहे. यावरून अमेरिकेतल्या प्रतिष्ठित ठग- पेंढारशाहीचा व येथल्या गुन्हेगारीचा तोंडवळा बराच सारखा आहे असे दिसून येईल. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत व विशेषतः गेल्या दहाबारा वर्षांत म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण अमेरिकेच्याच दिशेने वाटचाल करीत आहोत, हे दोहोंची तुलना करून पाहणाऱ्याच्या सहज लक्षात येईल. आणि मग आपल्या देशावर नजीकच्या भविष्यकाळात केवढी भयानक आपत्ती कोसळणार आहे याची त्याला कल्पना येईल.
 गेल्या वर्षी 'केसरी' च्या दिवाळी अंकात 'दुसरे आव्हान' हा लेख मी लिहिला होता. त्या वेळी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आपल्या देशाची स्थिती अमेरिका व रशिया यांहून अगदी निराळी कशी आहे ते सांगितले होते. अमेरिकेत औद्योगिक विकास झाला तेव्हा लोकशाही विकसित झालेली नव्हती. त्यामुळे पोटाला घासभर अन्न देऊन किंवा तेही न देता कारखानदार १८-१८ तास मजुरांच्याकडून काम करून घेत. कामगार त्या वेळी जागृत नव्हते, संघटित नव्हते, बलशाली नव्हते म्हणून हे शक्य झाले. रशियात औद्योगिक विकास सध्या चालू आहे. पण तेथे लोकशाहीचा गंधही नाही. स्टॅलिनने हजारो लाखो शेतकऱ्या- कामकऱ्यांचे काय अनन्वित हाल केले, केवढा भयानक जुलूम केला, त्याचे वर्णन तेथला नवा स्टॅलिन क्रुश्चेव्ह यानेच केले आहे. हिंदुस्थानात यातले काहीच शक्य नाही. म्हणून एक विचित्र समस्या आपल्यापुढे टाकून काळाने आपल्याला आव्हान दिले आहे असे त्या लेखात सांगितले आहे. प्रतिष्ठित पेंढारशाही- व्हाइट कॉलर क्राइम- हीही तशीच दुसरी समस्या - पहिली पेक्षाही घोरतर अशी समस्या- त्याच परिस्थितीमुळे आपल्यापुढे उभी आहे.
 अमेरिकेत फार मोठी लूटमार चालू आहे. जनतेचे भयंकर शोषण चालू आहे. पण तेथे धनसंपदाच इतकी विपुल आहे की हे शोषण सहन करण्याचे