पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५३
आपल्या लोकशाहीवरील नवे संकट

तरुण स्त्री-पुरुषांत ही पापवृत्ती फार बळावत आहे. यामुळे ते फारच चिंतातुर झाले आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरात तरुण स्त्रीपुरुषांच्या दीडशे ते दोनशे लुटारू टोळ्या आहेत !
 या वर्णनावरून ही नवी प्रतिष्ठित गुन्हेगारी गरीबीतून, अतृप्तीतून निर्माण झालेली नसून श्रीमंतीतून, अतितृप्तीतून निर्माण झालेली आहे हे स्पष्ट दिसून येईल. क्रोडोपती भांडवलदार, साहसी सुशिक्षित दरवडेखोर व राजकारणी नेते या त्रयीच्या धनलोभातून, सत्तालोभातून, नीतिभ्रष्टतेतून ही गुन्हेगारी निर्माण झालेली आहे. त्याच्यापुढे जुनी चोरी, घरफोडी ही गुन्हेगारी काहीच नव्हे. क्लरेन्स डॅरो या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने म्हटले आहे की आज अमेरिकेतील सर्व तुरुंगांची कवाडे खोलून सर्व गुन्हेगार कैदी मोकळे सोडून दिले तरी समाजनीतीत फारसा फरक पडणार नाही. कारण त्याच्यापेक्षा दसपट, शतपट गुन्हेगार तुरुंगाच्या बाहेरच आहेत. गेल्या पन्नास- साठ वर्षांत फ्रॉइड, जुंग, ॲडलर इ. मानसशास्त्रज्ञांनी व इतर समाज- शास्त्रज्ञांनी गुन्हेगार हा रोगी असतो, त्याला तुरुंगापेक्षा इस्पितळाची जरूर आहे, तो मनाने विकृत, दुबळा असतो, त्याला सुधारणे हे काम पोलिसाचे नसून डॉक्टरचे आहे इ. सिद्धान्त प्रस्थापित केले होते. नव्या गुंड, मवाल्यांनी, प्रतिष्ठित पेंढाऱ्यांनी हे सिद्धान्त धुरळ्यासारखे उधळून लावले आहेत. हे गुन्हेगार अत्यंत बुद्धिमान्, कणखर, पाताळयंत्री व दूरदर्शी असतात. मनोदौर्बल्यामुळे ते गुन्हेगार झाले असे कोणी शास्त्रज्ञ म्हणू लागला तर त्याच्याच मनाची तपासणी करावी लागेल. नवी गुन्हेगारी मनोदौर्बल्य किंवा भूक यातून निर्माण झालेलीच नाही. भांडवली समाजरचना आणि भ्रष्ट लोकशाही यांतून ही निर्माण झालेली आहे. म्हणून ती नष्ट करावयाची असेल तर आपली अर्थव्यवस्था आणि आपली राज्यपद्धती यांचे स्वरूप आमूलाग्र बदलले पाहिजे. जुन्या काळी राजाच्या व त्याच्या सरदारांच्या हाती अनियंत्रित सत्ता असे. ते उन्मत्त मदांध झाले की प्रजेचा अनन्वित छळ करीत. नुसती लूटमार करीत. ही अनियंत्रित सत्ता नको म्हणून विचारवंतांनी, लोकसत्तेची प्रस्थापना केली. पण भांडवलशाहीच्या अनियंत्रित सत्तेमुळे नव्या राज्यव्यवस्थेला, लोकशाही समाजव्यवस्थेला अत्यंत हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. आणि मागल्यापेक्षा जनतेचा अनेक पटींनी जास्त रक्तशोष