पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२
वैयक्तिक व सामाजिक

म्हणजे भांडवलशाहीची व सट्टेबाजीची अतिरिक्त वाढ हे होय. कष्टाविना पैसा ही वृत्ती यामुळे गेली शंभर वर्षे सारखी पोसत आलेली आहे. ठग-पेंढाऱ्यांनी केलेली लूट व व्यापारी, भांडवलदार, कारखानदार यांनी केलेली लूट यात एक बेकायदेशीर व दुसरी कायदेशीर आहे इतकाच फरक. नैतिक दृष्टीने दोन्ही प्रकार लुटीचे होत. 'ब्रास चेक' हे वर सांगितलेले पुस्तक अमेरिकेतील वृत्तपत्रसंस्थेविषयी आहे पण त्यात अमेरिकन भांडवलशाहीचे यथार्थ चित्र पाहावयास मिळते. 'ब्रास चेक' हा मूळ कुंटणखान्यातला शब्द आहे. तोच अप्टन सिंक्लेअर याने अमेरिकन भांडवलशाहीने चालविलेल्या वृत्तसंस्थेला लावला आहे. त्याच्या मते अमेरिकन वर्तमानपत्रे व एकंदर वृत्तसंस्था ही भांडवलशाहीची बटीक आहे. आणि अपार धन व अपार वृत्तसामर्थ्य या शक्तींच्या साह्याने त्यांनी अमेरिकेतील विधानसभा आपल्या दासी करून टाकल्या आहेत. भांडवलदारीची परिणती म्हणजे फायनॅन्स कॅपिटॅलिझम्. (पहिली व्यापारी भांडवलशाही, दुसरी औद्योगिक आणि तिसरी ही आर्थिक). गिरण्या, कारखाने, खाणी, आगगाडी, जंगले या व्यवसायांत भांडवलदारांनाही अपार कष्ट करावे लागतात. पण फायनॅन्स कॅपिटॅलिझम् हा कागदांचा खेळ आहे. बसल्या जागेवरून हा सहज खेळता येतो. याच्या जोडीला यातून निर्माण झालेली सट्टेबाजी. यामुळे पैसा व कष्ट यांची फारकत झाली. लक्ष्मी व नीति यांचाही संबंध संपला. अमेरिकन नागरिक हा गेली पन्नास वर्षे हे पाहत आहे. बँका, गिरण्या, कारखाने यांतून खोट्या कंपन्या उभारणे, दिवाळी काढणे, खोटे दस्तऐवज करणे, खोटी कंत्राटे देणे, घेणे, भांडवलदारांचे संघ उभारणे यांमुळे जनतेच्या कोट्यवधी डॉलरांची कशी लूट केली जाते हे त्याच्या ध्यानात येत आहे. त्यामुळे श्रमाविना पैसा ही वृत्ती बळावत गेली. आणि धनसाधनांच्या अभावी त्याने साहस, धैर्य, बेडर वृत्ती व संघटनाकुशलता या शक्तींच्या साह्याने भांडवलदार व त्यांचे सगे जे राजकारणी लोक यांच्या तोडीस तोड अशी ठग-पेंढाऱ्यांची जमात उभी केली व तिच्या आधारे राजकारण व सरकारी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. यामुळे अमेरिकन समाज अगदी भ्रष्ट होऊन गेला आहे. बार्नेसच्या ग्रंथात त्याने अनेक समाज- शास्त्रज्ञांची अवतरणे दिली आहेत. त्यांना आपल्या समाजाच्या भवितव्याची केवढी घोर चिंता लागून राहिली आहे ते त्यावरून स्पष्ट दिसते. अलीकडे