पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५१
आपल्या लोकशाहीवरील नवे संकट

ॲटर्नी जनरलकडे आणि तेथून प्रेसिडेंटकडे जाल. पण तेथेही तुमची निराशाच होईल. कारण पक्ष, निवडणुकी, त्यांची यंत्रणा आणि तिचे आधारस्तंभ या पाशातून तेही मुक्त होऊ शकत नाहीत.
 या संबंधात विवेचन करताना वार्नेस याने अमेरिकेतील दारूबंदीची माहिती दिली आहे. हा प्रयोग अत्यंत उदात्त होता पण त्याची प्रेरणा बहुधा सैतानाकडूनच मिळाली असावी. कारण या दारूबंदीच्या काळात कोट्यवधी लोक दारू पीत असत. आणि ही बेकायदा दारू पुरविण्यासाठी ठगांच्या ज्या टोळया त्या वेळी निर्माण झाल्या त्या म्हणजे गुन्हेगारीच्या शाळाच ठरल्या. दारूबंदी पुढे रद्द झाली. पण या शाळांचे कार्य चालूच राहिले. अल कॅपोन हा या काळातला सर्वांत मोठा पेंढारी होता. त्याचे महिन्याचे उत्पन्न १२ कोटी रुपयांचे होते. त्यातून तो दोन कोट रुपये पोलिसांपासून प्रॉसीक्युटर, न्यायाधीश, सीनेटर येथपर्यंत पोचवीत असे. ज्या चार स्टेट्समध्ये त्याचा धंदा चालत असे ती त्याने 'संरक्षित' करून घेतली होती. हे ठगाचे अधिराज्य याच पद्धतीने दारूबंदी रद्द झाल्यावर पुढेही चालू राहिले. या प्रतिष्ठित- व्हाइट कॉलर- ठगांनी फेडरल जज्जापर्यंतचे लोक दावणीला बांधलेले असतात. अगोदर पैशाचा मोह कठिण. दरमहा मिळणारे हजारो लाखो डॉलर सोडून देणे फार कठिण आहे. तो कोणी जिंकलाच तर बदनामी, मुले पळविणे किंवा खून या भीतीने माणूस वाकतो आणि त्यातून सुटलाच तर पक्षीय राजकारणी लोकांचे दडपण, पुढील निवडणुकांतील अपयश हा मोठा प्रश्न असतो. या मर्मावर आघात करूनच ठगांच्या बादशहांनी आपली निर्वेध सत्ता अमेरिकेत प्रस्थापित केली आहे. एका प्रख्यात गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला २१ न्यायाधीश, ९ वकील, अनेक स्थानिक अधिकारी व केन्द्रसरकारचे अनेक अधिकारी उपस्थित राहिले होते. अशा काही प्रसंगांचे वर्णन देऊन वार्नेस म्हणतो की अशा वेळी उपस्थित राहण्याची फर्माने सुटलेली असतात त्या बादशाही फर्मानांचा अवमान करणे कोणालाही शक्य नसते.
 गुन्हेगारीच्या या वाढीची कारणमीमांसा करताना बार्नेसने कारणे दिली आहेत. कुटुंबसंस्थेची विघटना हे एक फार मोठे कारण आहे. परकीय लोकांची आवक व त्याने अमेरिकन समाजाला आलेली विरूपता वा बकालीपणा हेही तसेच एक महत्त्वाचे कारण आहे. पण तज्ज्ञांच्या मते सर्वात महत्त्वाचे कारण