पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
वैयक्तिक व सामाजिक

पैशाने बांधलेले असतात. त्यांना दरमहा पगार चालू असतो. त्यातूनही एखादा लहान पोलीस अधिकारी कामाला लागलाच तर वरिष्ठ अधिकारी ताबडतोब त्याची बदली करतात किंवा त्याला बडतर्फ करतात. जेम्स हा ठगांचा बादशहा होता. त्याला पोलिसांनी एकदा पकडले व त्याच्यावर खटला भरला. त्या वेळी काही पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केले. तेव्हा ठगमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी करून त्यांच्या भराभर बदल्या करून घेतल्या. हे पोलिसांचे झाले. तेथे निराश होऊन आपला पापनिर्दालनसंघ पब्लिक प्रॉसीक्यूटरकडे जाईल. त्याचीही तीच स्थिती असते. त्याला ठग- पेंढाऱ्यांकडून पगार चालू असतो. किंवा पुष्कळ वेळा तोच त्यांच्या कंपनीत असतो. थॉमस ई. ड्यूईसारखा निःस्पृह प्रॉसीक्यूटर एकतर विरळा असतो, आणि तो काही धाडस करील अशी शंका येताच त्याला बढती देऊन वाटेतून दूर करण्यात येते. पूर्वी दरोडा घातल्यावर पोलिसांनी पकडले म्हणजे मग दरोडेखोर वकिलाकडे जात. आता सभ्य ठग पेंढाऱ्यांनी कायदेशीर सल्लागारांची मंडळेच स्थापन केलेली आहेत. त्यांतील वकील, बॅरिस्टर, प्रॉसीक्यूटर यांच्या सल्ल्यानेच दरोड्यांची किंवा रॅकेटची योजना सध्या आखली जाते.
 प्रॉसीक्यूटर बधत नाही असे पाहून आपले ध्येयवादी मंडळ ग्रँड ज्यूरीकडे जाईल. पण या ज्यूरीत कोण असते ? राजकारणी लोक ! सीनेटर ! तेही संबंधितच असतात. पक्षनिष्ठ राजकारण चालविण्यासाठी ठग-पेंढाऱ्यांची सेना अत्यंत अवश्य असते. त्या बादशहांना दुखविले तर निवडणुका हरतील हे राजकारणी लोकांना पक्के माहीत असते. १९५० साली शिकागोच्या निवडणुकीत याच कारणामुळे डेमोक्रॅटिक पक्षांचा पराभव झाला. तेव्हा राजकारणी लोक पुढील निवडणुकीवर नजर ठेवून या गुन्हेगार जगाला संभाळण्यातच गर्क असतात. ते या सज्जनांकडे कसे लक्ष देणार ? तेथून तुम्ही न्यायालयाकडे जाल. तेही यातून मुक्त नसतात. तेथून स्टेटच्या गव्हर्नराकडे जाल. त्याबद्दल बार्नेस म्हणतो की गव्हर्नर हे पूर्वीच्या कोठल्या तरी पक्षातलेच असतात. आणि ज्याचे पूर्वचरित्र अगदी निष्कलंक आहे असा गव्हर्नर अमेरिकेत दुर्मिळ आहे. सध्याच्या राजकीय पक्षाची यंत्रणाच अशी आहे की तिची चाके व तिचे आरे या ठगांनीच घडविलेले असतात. हे ध्यानात आल्यावर तुम्ही