पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४९
आपल्या लोकशाहीवरील नवे संकट

वळते. बँकांवर दरोडे ही अमेरिकन जीवनातील नित्याची बाब झाली आहे. दरमाल सुमारे १२० कोटी रुपयांपर्यंत यातून लूट होत असते. मोटारीच्या चोऱ्या हीही दैनंदिन गोष्टच आहे. या धंद्यातील संघटना इतकी कार्यक्षम आहे की मोटार चोरल्यापासून एक-दोन दिवसांच्या आत तिचे सुटे भाग निरनिराळ्या दहा शहरांत पोचविले जातात. आणि त्यातून नव्या मोटारी तयार होऊन विकल्या जातात. अमेरिकेत १९४९ साली १६ लक्ष ८६ हजार गुन्हे झाले. दर १८ सेकंदाला एक असे हे साधारण प्रमाण आहे. दर दिवशी ३६ खून, १५० दरोडे, व २५५ बलात्कार झाले. आणि हे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच आहे असे त्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ सांगतात. अमेरिकेत सर्वत्र दहशतीचे वातावरण होऊन बसले आहे, असे आजचे तज्ज्ञ सांगत आहेत.
 आपल्याला असे वाटते की यांना आळा घालण्याचा काहीच प्रयत्न होत नाही काय ? अमेरिकेतील दक्ष, कार्यक्षम, जनसेवातत्पर पोलीस काय करीत आहेत ? तेथे कायद्याचे राज्य आहे की नाही ? याचे उत्तरही शास्त्रज्ञांनी दिले आहे. वाचकांनी त्याचे नीट मनन करावे. म्हणजे भारताच्या भवितव्यात काय वाढून ठेविले आहे त्याची त्यांना कल्पना येईल. (वर दिलेली, व पुढे येणारी माहिती हॅलरी एल्मर वार्नेस यांच्या 'सोसायटी इन् ट्रॅन्झिशन' या ग्रंथांतून घेतलेली आहे. दुसरी आवृत्ती १९५२- न्यूयॉर्क. या विषयावरचा हा फार मोठा ग्रंथ असून शेकडो समाजशास्त्रज्ञांच्या ग्रंथांचे संदर्भ व त्यांतील उतारे लेखकाने दिले आहेत. याच्या जोडीला 'ब्रास चेक' हा अप्टन सिंक्लेअर या जगविख्यात कादंबरीकाराचा ग्रंथही पहावा.)
 गुन्हेगारी भयानक स्वरूपात व तितक्याच भयानक वेगाने सारखी पसरत असताना, अब्जावधी डॉलरांची लूट व त्यापायी शेकडो खून दरसाल पडत असताना अमेरिकनांसारखे प्रगत व कार्यक्षम लोक या प्रकाराला आळा का घालू शकत नाहीत यांचे उत्तर बार्नेस याने पुढीलप्रमाणे दिले आहे. पहिली गोष्ट अशी– ज्यांनी या अधम कृत्यांना आळा घालायचा त्यांचे चारित्र्य अगदी निष्कलंक असले पाहिजे. ते स्वतः निःस्वार्थी, त्यागी व धैर्यशील असणे अवश्य आहे. असे दहावीस लोक एकत्र जमून त्यांनी या उद्योगाला प्रारंभ केलाच तर त्यांना काय अनुभव येईल ? बार्नेस म्हणतो, हे लोक गुन्ह्याची वार्ता कळताच प्रथम पोलीसाकडे जातात. पण पोलीस हे या सभ्य पेंढाऱ्यांच्या