पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
वैयक्तिक व सामाजिक

ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे. त्यांना आर्थिक सुस्थिती तर मिळतेच पण सामाजिक प्रतिष्ठा, सत्ता या त्यांच्या तृष्णाही आता तृप्त होत आहेत. चित्रपट, रेडिओ, टेलीव्हिजन यांमुळे अत्यंत श्रेष्ठ मनोरंजनही सर्वाना सुलभ झाले आहे.
 अशा या अमेरिकेत आतापर्यंत जगाच्या कोणच्याच देशात नसेल इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांतील अमेरिकेतील गुन्हेगारीचा इतिहास वाचून जगाच्या प्रगतीबद्दलची आशा जळून खाक होते. अमेरिकेतल्या या गुन्हेगारीला 'व्हाइट कॉलर क्राइम' असे तेथील शास्त्रज्ञ संबोधितात. याचा अर्थ असा की दारिद्र्य, अतृप्ती, मनोविकृति यांमुळे हे गुन्हे घडलेले नसून सभ्य, प्रतिष्ठित, सज्जन गणलेल्या लोकांचीच ही कृत्ये आहेत. या गुन्हेगारीचे पहिले विपरीत लक्षण म्हणजे ती सर्व संघटित गुन्हेगारी आहे. व्यापार, कारखानदारी, वाहतूक यांसाठी जशा कंपन्या, कॉर्पोरेशनस्, सिंडिकेट्स् स्थापलेली असतात तशीच ही 'क्राइम सिंडिकेट्स्' असतात. चेअरमन, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही सर्व व्यवस्था त्यांच्यातही असते. आणि न्यूयॉर्क, शिकॅगो, वॉशिंग्टन या शहरात ज्या भागात मोठेमोठे भांडवलदार, पेढीवाले, व्यापारी, कारखानदार यांच्या कचेऱ्या असतात त्याच भागात, त्यांच्या शेजारीच या प्रतिष्ठित ठग-पेंढाऱ्यांच्याही कचेऱ्या असतात. आता गुन्हेगारी ही दरिद्री वस्तीत, लहान बोळात किंवा गावाबाहेरच्या हीन वस्तीत राहात नाही. ती राजवाड्याजवळच्या प्रासादांत राहते. 'रॅकेटिअरिंग' हा शब्द या संबंधांत नेहमी वापरला जातो. हा उद्योग पुढीलप्रमाणे चालतो. हे ठगांचे संघ क्रमाने एकेका व्यवसायाकडे लक्ष पुरवितात. कोणातरी प्रतिष्ठित, श्रीमंत कापडवाल्याच्या दुकानात यांचे प्रतिनिधी जातील आणि 'तुमचे संरक्षण आम्ही करू, दरमहा ५०० डॉलर देत चला अशी प्रथम सूचना करतील. शेटजींना प्रथम काहीच कल्पना नसल्यामुळे ते साहजिकच मागणी नाकारतात. पण पुढील दहा-पंधरा दिवसांत 'संरक्षण' घेणे आवश्यक आहे हे त्याच्या ध्यानात येते. त्याच्या गुदामाला आग लागते, मोटारीला अपघात होतो, कापडाचे ट्रक नाहीसे होऊ लागतात. पाहून घाबरून जाऊन ते महिना ५०० डॉलर्स चालू करतात. नंतर थोड्याच दिवसांत बहुसंख्य कापडवाले असे संरक्षण घेतात. मग ही संक्रांत इतर धंद्यांकडे