पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्गार काढले आहेत. या मंत्र्यांच्या कोणत्या प्राथमिक वासना अतृप्त राहिल्या आहेत ? डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कारखानदार, भांडवलदार, पेढीवाले, व्यापारी, काँग्रेसचे मंत्री व काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष व इतर सरकारी अधिकारी हे स्वार्थ, लोभ यांमुळेच पापे करतात यांत शंका नाही. त्यांच्या दुष्कृत्यांच्या बुडाशी वासनाच आहेत. पण हेही सर्व परिस्थितीमुळेच होते असे म्हणावयाचे काय ?
 आपल्याकडच्या या सभ्य जनांच्या कहाणीपेक्षा अमेरिकेतील सभ्य जनांची कहाणी फार भयंकर आहे. ती आपल्याला उद्बोधक होईल म्हणून तिचा थोडा परामर्श घेऊ.
 अमेरिका हा देश किती श्रीमंत आहे त्याची साधारण कल्पना आपल्याकडे सर्वांना आहेच. तेथली वर्णने वाचून स्वर्ग, कुबेरनगरी या पुराणांतल्या कल्पना साकार झाल्या आहेत असे वाटते. भारताच्या केंद्रसरकारचा अर्थसंकल्प ५०० कोटींचा असतो. त्यात प्रदेश सरकारचे संकल्प मिळवले तर हे १५०० कोटींपर्यंत जाईल. म्हणजे आमचा राष्ट्रीय अर्थसंकल्प १५०० कोटींचा होतो. अमेरिकेत दरसाल १६०० कोटींच्या सिगरेटस् खपतात. या आंकड्यांवरून आपल्याला बराच अदमास लागेल. हे जे अपार अनंत धन तेथे आहे त्याची वाटणी पूर्वी अत्यंत विषम होती. पण गेल्या वीस वर्षांत आता तीही तक्रार फारशी राहिलेली नाही. अन्नवस्त्राची ददात तेथे आता कोणालाच नाही. मनुष्य बेकार असला तरी त्याच्या कुटुंबाच्या पोषणाचा भार कायद्यानेच सरकारवर असतो. सामान्य मजुरांनाही तेथे महिन्याला ६००-७०० रु. पगार असतो. त्यामुळे अन्नवस्त्राची प्राथमिक भूक भागत नाही असा तेथे कोणीच नाही. कामवासनेच्या बाबतींत तर आपल्या तुलनेने तेथे निर्बंधच नाहीत असे म्हणावे लागेल. १६-१७ व्या वयापासूनच तरुण- तरुणींना तेथे परस्परांचा निकट सहवास आणि स्पर्शसुख लाभू शकते. स्त्रीच्या जीवनाचा संपूर्ण विकास होण्यास तेथे पूर्ण अवसर आहे. नाचणे, गाणे, खेळणे, अर्थार्जन करणे, स्वतंत्र विचार करणे, पति निवडणे, विद्या- कला यांत प्रगती करून घेणे या सर्व दृष्टींनी तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणच्याही बाबतीत वासना दडपून काही गंड तयार व्हावे अशी स्थिती तेथे नाही. कामगार, शेतकरी हा कष्टकरी वर्ग. त्याच्या वासना सर्वत्र अतृप्त असतात. पण अमेरिकेत