पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
वैयक्तिक व सामाजिक

वरील संयम सुटल्यामुळे त्याच्या हातून गुन्हा घडतो. जन्मतः तो अधम असतो असे नाही. किंवा एकदा गुन्हा केल्यावर तो कायम बदमाषच राहील असे नाही. यासाठी त्याला बरी परिस्थिती निर्माण करून द्यावी, ज्या उणीवेमुळे, ज्या भुकेच्या अतृप्तीमुळे तो वाममार्गी झाला असेल ती भूक शमवावी म्हणजे पापी मनुष्य पुन्हा सज्जन होईल व भला नागरिक होईल, असे नवे शास्त्र आहे. डॉ. सिगमंड फ्रॉइड, जुंग, अडलर या मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धान्तांच्या आधारे पाश्चात्त्य पंडितांनी ते तयार केले आहे. याविषयी विवेचन करताना हे पंडित असे सांगतात की पापकर्मी मनुष्याला गुन्हेगार न समजता रोगी समजावे, त्याला तुरुंगात न धाडता डॉक्टरकडे धाडावे; विशेषतः मानसोपचारी डॉक्टरकडे धाडावे. अर्थवादी पंडित थोडी निराळी उपपत्ती मांडतात. पण ते परिस्थितीवादीच असतात. दारिद्र्य, उपासमार, भूक ही सर्व पापकृत्यांच्या बुडाशी आहे आणि मनुष्याच्या गरजा तृप्त करण्याची व्यवस्था समाजाने केली की गुन्हेगारी कमी होईल, नष्ट होईल, अशी ते ग्वाही देतात.
 हा सर्व विचार डोळ्यापुढे आला की मनुष्याच्या गुन्हेगार प्रवृत्तीचा फेरविचार करणे अवश्य आहे असे वाटते. तसे न करता नवे तत्त्वज्ञान आपण स्वीकारले तर आपल्या समाजात लवकरच प्रलयकालाची चिन्हे दिसू लागतील अशी भीती वाटते. परिस्थितीमुळे मनुष्य गुन्हेगार होतो म्हणजे काय ? माणूस दरिद्री असला, घरात खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही अशी त्याची स्थिती असली तर त्यामुळे तो पापवृत्त होईल हे समजू शकते. पण प्रारंभी जी दुष्कृत्ये सांगितली ती तशा प्रकारची आहेत काय ? अन्नवस्त्रादि प्राथमिक गरजा भागल्या की मनुष्य गुन्हेगारीकडे वळणार नाही असे वरील हकीकतीवरून दिसते काय ? पाचशे रुपये पगार असलेले इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक यांच्या कोणच्या प्राथमिक वासना अतृप्त राहिल्या होत्या ? लाखांनी पैसे मिळविणारे कारखानदार, भांडवलदार, पेढीवाले, व्यापारी यांच्या पापकर्माची जबाबदारी कोणच्या परिस्थितीवर टाकता येईल ? राज्यसरकारची जी मंत्रिमंडळे आहेत त्यांत प्रत्येक प्रदेशात दुफळी झालेली आहे. आणि भांडणे तत्त्वासाठी नसून सत्तालोभ, धनलोभ यांतूनच उद्भवलेली आहेत. ती इतकी विकोपाला गेलेली आहेत की काँग्रेसचे अध्यक्ष ढेबरभाई यांनी ही संघटनाच मोडून टाकावी असे वैतागाने अनेक वेळा