पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४५
आपल्या लोकशाहीवरील नवे संकट

योजना सरकारी आहेत. तेथेही हीच तऱ्हा. तेथील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेले सीमेंट, लोखंडी सामान, चुना इ. सामग्री धरणापर्यंत पोचत नाही. भाक्रा-नानगलवरील अठ्ठावीस इंजिनियरांना यासाठी अटक झाल्याचे वृत्त मागे आलेच होते.
 आणि यावर कळस म्हणजे सर्वांचे लाडके असलेले, देशाचे आधारस्तंभ म्हणून गणलेले शाळा-कॉलेजांतील विद्यार्थी. पेपर जरा अवघड वाटताच हे उठून धावत व्हाइस चॅन्सेलरच्या बंगल्यावर जाऊन निदर्शने करतात. परीक्षेत नापास केल्याबद्दल शिक्षकांना मारहाण करतात. शाळेची मोडतोड करतात; खेळाच्या मैदानावर, संमेलनाच्या समारंभात शिक्षक, मुख्याध्यापक, यांपैकी कोणाचीही मुर्वत न राखता बेफाम होऊन मारामाऱ्या करतात. मुलींच्या डब्यात बसणें, त्यांच्या वसतिगृहात शिरणे, केवळ बायकांच्यासाठी असलेल्या समारंभात घुसणे, हा ते आपला जन्मसिद्ध हक्कच समजतात. दिल्ली, लखनौ, कलकत्ता, औरंगाबाद, मद्रास, सांगली, अर्नाकुलम, सर्व ठिकाणांहून याच वार्ता येत आहेत. हे आता नित्याचे झाले आहे.
 विद्यार्थ्यांचे अत्याचार म्हणजे सर्वांवर कळस आहे असे वर म्हटले खरे पण अजून याहीपलीकडे एक दुःखद घटना आहे. महात्माजींच्या सहवासात ज्यांनी हयात घालविली, पंडितजींच्या सान्निध्यात जे अनेक वर्षे होते अशा सज्जनांनी कोटीकोटीची जिंदगी केल्याचे उघडकीस येऊ लागले आहे.
 हे सर्व पाहून आभाळ फाटल्यासारखे वाटते. आणि आपल्या समाजाचे पुढे काय होणार याची दारुण चिंता मनाला ग्रासून टाकते.
 याविषयीची चिंता समाजातले थोर थोर पंडित करीतच आहेत. गुन्हेगारीला मनुष्य का प्रवृत्त होतो, त्याच्या ठायी पापप्रवृत्ती कशामुळे निर्माण होते याची समाजशास्त्रज्ञ आज मोठ्या गंभीरपणे चिकित्सा करीत आहेत. पाश्चात्य देशांत तर अक्षरश: हजारो पंडित याचा अभ्यास करीत आहेत आणि नित्य नव्या उपपत्ती मांडीत आहेत. या सर्वांत प्रभावी ठरलेली एक उपपत्ती अशी आहे की गुन्हेगार हा मूलतःच जन्मतःच दुष्ट प्रवृत्तीचा, अधोगामी असतो हे मत चुकीचे असून त्याची तशी प्रवृत्ती होण्यास परिस्थिती ही कारण असते. मनुष्य परिस्थितीमुळे गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. दारिद्र्यामुळे, अन्नान्नदशा झाल्यामुळे, इतर वासना अतृप्त राहिल्यामुळे, कामक्रोधा-
 वै. सा... १०