पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
वैयक्तिक व सामाजिक

आणि वातावरण असे दहशतीचे आहे की पोलिसांना पुरावा जमविणे अशक्य आहे. (सकाळ, फेब्रुवारी १९५४)
 बनारसच्या हिंदु विद्यापीठाविषयी मुदलियार कमिटीने राष्ट्रपतींना सादर केलेला अहवाल प्रसिद्धच आहे. वर्षानुवर्षे तेथील अधिकारी खोटे हिशेब, पैशाचा अपहार, सग्यासोयऱ्यांच्या नेमणुका, परीक्षेतील वशिलेबाजी इ. पापे बिनदिक्कत आचरीत आहेत. या गुन्हेगारीत तेथील प्राध्यापक, विद्यार्थी व इतर अधिकारी सर्व सारखेच सामील आहेत. डॉ. राधाकृष्णन्, अमरनाथ यांसारख्या थोर पुरुषांना तेथे सुधारणा तर करता आली नाहीच उलट त्यांनाच तेथून काढता पाय घ्यावा लागला.
 आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता ११ वर्षे पुरी झाली. एवढ्या अवधीत शील, चारित्र्य, सत्यनिष्ठा, यांची किती प्रगती झाली हे आपण पाहू लागलो तर मन कळंजून जाते. जिकडे पहावे तिकडे गुन्हेगारी, मवालीगिरी, गुंडगिरी, भ्रष्टता, अपहार, वशिलेबाजी, दरवडे, रक्तपात, खून! आणि यातून अमुक एक प्रदेश, अमुक वर्ग वा जाती वा समाज वा क्षेत्र मुक्त आहे असे नाही. सरकारच्या कोणत्याही खात्याविषयीचा ऑडिटरचा अहवाल पाहिला तर हेच दिसून येईल. अपहार, खोटे हिशेब, अफरातफर ! संरक्षण खात्याच्या एका अहवालात ३ कोटी १८ लक्ष रुपयांची रोकड नाहीशी झाली असा शेरा दिलेला आहे. प्रदेश काँग्रेस कमिट्यांच्या हिशोबाच्या वार्ता येणेप्रमाणेच आहेत. हिशेबाच्या वह्यांत हिशेबनीस शिरला की खंडीभर घाण बाहेर येतेच. मग अध्यक्ष पळून जातात. नंतर वरचे अधिकारी येऊन सारवासारव करून प्रकरणे मिटवून टाकतात. सर्वोदय केंद्रांना सरकारने दिलेल्या देणग्यांचे काय होते त्याची कथा आचार्य विनोबांना लोकांनी सांगितली ती प्रसिद्धच आहे. विमा कंपन्यांचा कारभार भ्रष्ट होऊ लागला म्हणून सरकारने त्यांचे राष्ट्रियीकरण केले. त्याबरोबर त्यातून मुंदडा प्रकरणे उत्पन्न होऊ लागली. केरळ विषबाधा प्रकरण ताजेच आहे. भाडे कमी पडावे म्हणून जालीम विषाच्या पेट्यांवर कंपनीने निराळीच नावे लिहिली. आणि त्यामुळे दीडदोनशे माणसाचे बळी पडले. आपल्या इस्पितळांची वर्णने याच मासल्याची आहेत. रोग्यांसाठी घेतलेली औषधे, उपकरणे त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत. मधल्यामधेच ती नाहीशी होतात. आणि परत बाजारात येतात. धरण बांधण्याच्या