पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 या वर्षाच्या आरंभी लोकसभापती श्री. आयंगार यांचे चित्तूर येथे वकिलांच्या पुढे भाषण झाले. ते म्हणाले, "सध्या देशात गुंडगिरी, मवाली वृत्ती फार वाढत चालली आहे. तिला नियंत्रण घालावे म्हणून पुष्कळ कायदे केलेले आहेत पण त्यांचा काही उपयोग नाही. कारण कायदा आपले काही करू शकणार नाही ही गुंडांची खात्री आहे. असे का असावे याचेही कारण उघड आहे. आपली अंमलबजावणीची यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. गुन्हेगार पकडून त्याच्यावर फिर्याद केली की ती काढून घ्यावी म्हणून दडपण येते. धमक्याही येतात. पुष्कळ वेळा फिर्याद नोंदण्याच्या आधीच धमक्या येतात. गुन्हेगारांना हे कळते कसे ? अर्थात् त्यांना पोलिसांचा पाठिंबा असतो. या सर्व प्रकारामुळे कायदा पाळणारे नागरिक निराश होतात." हे सर्व सांगून वकिलांनी गुंडांची बाजू घेऊ नये असा सभापतींनी त्यांना उपदेश केला.
 मलबार- फेरोक या विभागात गुन्हेगारी वाढत आहे अशी तक्रार करून अर्थमंत्री सुब्रह्मण्यम् यांनी राजकीय पक्षांचा या गुन्हेगारीमागे हात असतो, राजकीय पक्ष गुंडांना पोशीत असतात असे सभागृहात सांगितले. ग्रामीण विभागात तर आपली उद्दिष्टे साधण्यासाठी गुंडांचा सर्रहा वापर केला जातो असे त्यांचे म्हणणे आहे : (सकाळ, ऑगस्ट १९५५)
 बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांनी मुंबईच्या मुख्य मंत्र्यांना पत्र पाठवून प्रार्थना केली की, कायद्यात त्वरेने दुरुस्ती करा. सध्या या भागात खुनी व दरवडेखोर यांनी धुमाकूळ घातला आहे.