पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४१
समाजकारणाची बचावती ढाल

सावरकरांनी अस्पृश्यांना आणि विशेषतः महारबंधूंना आवाहन केले आहे. 'हिंदुधर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही आपल्या रक्ताने धुऊन काढू' ही आंबेडकरांची प्रतिज्ञा सावरकरांना अत्यंत योग्य व खऱ्या हिंदूस शोभण्यासारखी वाटली. त्यामुळे त्यांचा सत्याग्रह त्यांना न्याय्यच वाटला. महाड, पुणे (पर्वती) येथील सत्याग्रहाचे सावरकरांनी जोरदार भाषेत समर्थन केले आहे. पण धर्मांतर हा उपाय मात्र त्यांना अगदी मान्य नाही. त्यामुळे अस्पृश्यांचाच अधःपात होईल असे त्यांचे मत आहे.
 बॅ. सावरकरांच्या मते अस्पृश्यता म्हणजे स्पर्शबंदी आणि तसल्याच इतर सप्त-बंदी म्हणजे बेड्या तोडण्यास विज्ञानाचा प्रसार हा एकच उपाय आहे. पोथीजात उच्चनीचतेचे सर्व तत्त्वज्ञान अत्यंत भ्रांतिमूलक अशा सिद्धान्तावर आधारलेले आहे. विज्ञानाने निर्माण केलेल्या शास्त्रापुढे, नव्या तत्त्वज्ञानापुढे, ते क्षणमात्र टिकू शकणार नाही. तेव्हा या विज्ञाननिष्ठेचा प्रसार हेच या शृंखला तोडण्याचे खरे हत्यार होय. युरोपने याच मार्गाने आपली प्रगती करून घेतली हे अनेक लेखांमधून त्यांनी पुनः पुन्हा दाखविले आहे. हिंदूंपैकी सनातन धर्माचा कैवार घेणारे लोक मुसलमानांच्या पोथीनिष्ठ कट्टरपणाकडे बोट दाखवून कित्येक वेळा सांगतात की त्या कट्टरपणामुळेच मुसलमान सर्वत्र विजयी झाले व होत आहेत. तेव्हा आपणही तसेच पोथीनिष्ठ नि कट्टर झाले पाहिजे. पण हा भ्रम सावरकरांनी 'विज्ञानबळ' या आपल्या लेखात समूळ उच्छेदून टाकला आहे. मराठ्यांचा उदय झाला तेव्हा मुसलमान तितकेच कट्टर होते. पण त्यांचे साम्राज्य मराठ्यांनी सहज धुळीस मिळविले. युरोपात तेच झाले. विज्ञानाचा उदय युरोपात झाला नव्हता तेव्हा काही ठिकाणी मुस्लिमांना जय मिळाले. पण युरोप विज्ञाननिष्ठ होताच मुस्लिम सत्ता त्यांच्यापुढे उभ्यासुद्धा राहू शकल्या नाहीत. तुर्कस्तान हा त्याला अपवाद आहे पण त्याला हे सामर्थ्य प्राप्त झाले ते विज्ञानबळामुळेच होय, अंध अविवेकामुळे नव्हे हे स्वातंत्र्यवीरांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.
 शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठ, श्रुतिस्मृति-पुराणोक्त व अपरिवर्तनीयता, यांतून आपल्या सात स्वदेशी बेड्या निर्माण झाल्या आहेत. तेव्हा त्यांचा उच्छेद करावयाचा तर त्या शब्दप्रामाण्यादि रूढींचा प्रथम उच्छेद केला पाहिजे.