पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
वैयक्तिक व सामाजिक

मिळून तो दोष दूर करावा हे उचित. मद्रासमधील अस्पृश्य जातींची माहिती देताना, नि त्रावणकोरच्या सुधारणांचे विवेचन करताना आणि अन्यत्रही त्यांनी अनेक ठिकाणी हा विचार आवर्जून मांडला आहे. याचा अर्थच असा की उपाय योजावयाचे ते सर्वांनीच योजले पाहिजेत. कारण भारतीय राष्ट्र-पुरुषाच्या पायांत या स्वदेशी श्रृंखला ठोकून बसविण्याच्या कामात लोहाराचे काम सर्वानीच केले आहे !
 उपायचिंतनाच्या प्रारंभीच भूमिका अशी स्पष्ट करून घेतल्यानंतर स्वातंत्र्यवीरानी धर्मांतराच्या उपायाचा विचार केला आहे आणि तो मार्ग सर्वस्वी त्याज्य होय असे आपले मत दिले आहे. 'धर्मांतराच्या प्रश्नाविषयी महारबंधूंशी मनमोकळा विचार' या शीर्षकाखाली त्यांनी तीन लेख लिहिले आहेत. आणि धर्मांतराने कोणते अनर्थ होणार आहेत ते त्यांत सांगितले आहेत. स्वातंत्र्यवीरांचे म्हणणे असे की, सर्वच्या सर्व महार जाती धर्मांतर करणे कधीही शक्य नसल्यामुळे या धर्मांतरामुळे एक नवीनच जात निर्माण होईल. शिवाय धर्मांतर केलेल्यांची अस्पृश्यता जाईल व केवळ धर्मांतरामुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त होईल असे नाही. दुसरे असे की महार जातीतील हजारोंनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी न स्वीकारणारांची संख्या किती तरी मोठी आहे. आणि यामुळे त्यांच्यात्यांच्यात उभा दावा निर्माण झाला आहे. इतर अस्पृश्य जाती तर धर्मांतरास मुळीच तयार नाहीत. त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न धर्मांतराने सुटणार आहे असे स्वप्नात सुद्धा मानता येणार नाही. यांसारखे अनेक युक्तिवाद सावरकरांनी या व अन्य लेखांत मांडले आहेत. पण त्यांचा सर्वात प्रभावी युक्तिवाद अगदी निराळा आहे. ते म्हणतात की हा हिंदुधर्म काय केवळ स्पृश्यांचा आहे ? त्याच्या रक्षणार्थ आजवर अस्पृश्यांनी काय रक्त सांडलेले नाही ? त्याच्या तत्त्वज्ञानात रोहिदास, चोखा, सजन, तिरूवल्लुवर यांनी काहीच भर घातलेली नाही ? असे असताना आजच्या काही वरिष्ठ वर्गांनी अन्याय केला तर त्यांच्याशी झगडून आपल्या स्वत्वाचे प्राणपणाने रक्षण करण्याचे सोडून तो स्वतःचा धर्मच टाकून देणे हे सावरकरांच्या मते नेभळेपणाचे लक्षण होय, 'हिंदुधर्म ही काही स्पृश्यांच्या बापाची मत्ता नाही; आमचाही तिच्यावर त्यांच्याइतकाच हक्क आहे' असे अस्पृश्यांनी सडेतोडपणाने सांगून त्यांच्याशी झुंजून आपले न्याय्य स्वत्व मिळवावे असे