पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३९
समाजकारणाची बचावती ढाल

या पायरीवरून स्पृश्यांनी अस्पृश्य वस्तीत जाऊन भजने म्हणणे, अस्पृश्यांनी स्पृश्य वस्तीत भजनासाठी येणे, शाळेत स्पृश्य व अस्पृश्य मुलांनी सरमिसळ बसणें, हळूहळू देवळात अस्पृश्यांना सर्वाच्या बरोबर प्रवेश देणे, स्त्रियांचे हळदीकुंकू समारंभ सरमिसळ करणे आणि शेवटी सर्रास सर्वानी एका पंक्तीला बसणे या पायरीपर्यंत सावरकरांनी हिंदुसमाजाला नेले हा फार मोठा विक्रम आहे. त्रावणकोरच्या राजाने अशाच सुधारणा आपल्या राज्यात घडवुन आणल्या होत्या, पण तेथेही अस्पृश्यांतील पालुवा व पारिया या जातींना प्रवेश दिलेला नाही. आणि भंग्यांना तर मुळीच नाही. रत्नागिरीच्या पतितपावनमंदिरात यच्चयावत् हिंदुमात्राला प्रवेश मिळतो, एवढेच नव्हे तर हे सर्वं पूर्वास्पृश्य वेदोक्ताने त्या मंदिरात देवाची पूजा करू शकतात. तो अधिकार त्रावणकोरात मंदिरात प्रवेश मिळालेल्या एझुवा जातीच्या अस्पृश्यांनाही नाही. बॅ. सावरकरांच्या पुण्याईची यावरून आपल्याला सहज कल्पना येईल. त्रावणकोरात राजशासनाला जे करता आले नाही ते रत्नागिरीस सरकारी अवकृपेत वावरणाऱ्या स्थानबद्ध अशा एका व्यक्तीने करून दाखविले.
 जातिभेदाचे सावरकरांनी तात्त्विक खंडन केले, व त्यामुळे झालेले व भविष्यात होणारे अनर्थही वर्णून सांगितले. उपायाच्या चिंतनास आरंभ करताना पहिली गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आहे की या अनर्थाला भारतातील एकच एक अशी कोणतीच जात किंवा वर्ण जबाबदार धरता येणार नाही. ब्राह्मण व क्षत्रिय जतकी अस्पृश्यता चांभार- महारांविषयी पाळतात, तितकीच अस्पृश्यता चांभार-महार हे धेड-भंग्यांविषयी पाळतात. त्रावणकोरात पालुवा व पारिया जातींना मंदिरप्रवेश देण्यास एझुवा या अस्पृश्य जातीचाच विरोध आहे. आपल्याला ब्राह्मण-क्षत्रियादि वरिष्ठ मानलेल्या जातींनी बरोबरीचा मान द्यावा अशी महारांची मागणी आहे. पण तीच मांग-भंगी यांची मागणी त्यांना मान्य होत नाही. ही प्रत्येक जातीची दुःखद कहाणी असताना आज त्या पापाचे खापर एका जातीने दुसरीच्या माथी फोडण्यात काय अर्थ आहे ? सावरकर म्हणतात, 'जी जी शिवी अस्पृश्य स्पृश्यांना देतात ती ती त्या अस्पृश्यांना स्वतःलाही दिली जाते हे त्यांनी विसरू नये.' तेव्हा सर्वच या महाअनर्थाला जबाबदार आहेत, सारेच दोषी आहोत हे जाणून सर्वांनी