पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
वैयक्तिक व सामाजिक

शेकडो उदाहरणांवरून दाखवून देता येईल. तसे दाखवून अनुवंशाच्या आधारावर पोथीजात उच्चनीचतेचे, त्या मात स्वदेशी शृंखलांचे, समर्थन करणे हे विवेकबुद्धीचे दिवाळे निघाल्याचे लक्षण आहे असे स्पष्ट मत सावरकरांनी मांडलेले आहे.
 पण याहीपेक्षा जातिभेदाने या देशात गेल्या हजार वर्षांत प्रत्यक्ष अनर्थ काय घडले त्याचे जे चित्रण सावरकरांनी केले आहे ते पाहून या सप्तशृंखलांवर घण घालणे हाच खरा धर्म होय, हेच थोर राष्ट्रकार्य होय, हे कोणाही देशहिताची चिंता वाहणाऱ्या नागरिकाला पटल्यावाचून राहणार नाही. जातिभेद म्हणजे धर्मरक्षण असे सनातनी लोक मानतात. पण या जातिभेदानेच आपली धर्महानी झाली आणि त्यामुळेच पुढे व्यापार, साम्राज्य व शेवटी स्वराज्य यांची हानी झाली हे लक्षात घेतले तर स्वतःला सनातनी म्हणविणाऱ्या लोकांनी हिंदुराष्ट्राचा केवढा घात केला आहे हे ध्यानात येईल. मागे हिंदू लोक व्यापारासाठी, साम्राज्यासाठी व धर्मप्रसारासाठी तिन्ही खंडांत जात होते. पण जातिभेदाच्या कल्पना तीव्र झाल्या तेव्हा परदेशी गेल्यास इतर जातींशी अन्नोदक संबंध घडेल, स्पर्शास्पर्श-विचार पाळता येणार नाहीत, अभक्ष्यभक्षण- अपेयपान करावे लागेल आणि मग जातिबहिष्कृत व्हावे लागेल अशी भीती सर्वत्र निर्माण झाली आणि म्हणून समुद्रगमन, परदेशगमन निषिद्ध झाले. म्हणजे बेटीबंदीतून ही सिंधुबंदी निघाली. आणि हा सारा समाज करंटा होऊन गेला. मलरबारच्या राजास आपल्या काही लोकांनी दर्यावरील व्यापारात प्रवीण व्हावे अशी इच्छा झाली. तेव्हा त्या वेळच्या प्रौढ पोक्त हिंदूंनी असे ठरविले की प्रत्येक कुटुंबातील एका पुरुषाने मुसलमान व्हावे ! समुद्र ओलांडला तर जात जाईल. त्यापेक्षा जात घालविणारा धर्मच सोडावा हे बरे. जातिभेद हे धर्मरक्षणासाठी आहेत. पण समुद्रगमनाच्या ते आड येतात म्हणून उपाय काय ? तर धर्मत्याग !
 समाज संघटित, एकात्म व बलशाली करणे हे धर्माचे अंतिम ध्येय असते. समाज विघटित व बलहीन आणि म्हणूनच परतंत्र करून टाकणाऱ्या सप्तशृंखलांवर घण घालून त्या तोडून टाकण्यात सावरकरांनी तेच ध्येय साधले आहे. स्वातंत्र्यवीर रत्नागिरीस गेले तेव्हा महारांच्या सावलीचाही विटाळ मानण्याची शेकडो वर्षांची दुष्ट व घातक रुढी तेथे दृढपणे पाळली जात होती.