पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३७
समाजकारणाची बचावती ढाल

 अनुवंशाच्या कल्पनेचा आधार जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या समर्थनार्थ नेहमी घेतला जातो. त्याचाही सावरकरांनी असाच धुरळा करून टाकला आहे. आज हिंदू समाजात असलेल्या शेकडो जाती, पोटजाती या रक्तातल्या तितक्या भिन्न गुणांमुळे निर्माण झाल्या हे म्हणणे किती हास्यास्पद आहे हे वरवर पाहतासुद्धा दिसणार आहे. पण सावरकरांनी तेवढ्यावर ते ठेवले नाही. त्यांनी अनेक जातींचे इतिहास देऊन अत्यंत क्षुद्र कारणांनी, वेडगळ कारणांनी त्या कशा निर्माण झाल्या आहेत ते दाखविले आहे. गंध लावण्याच्या मानापमानावरून कचोळे फेकून कोणी एकाने दुसऱ्यास मारले, तेवढ्यावरून तेढ माजली, बहिष्कार पडला आणि बहिष्कृतांची निराळी 'कंचोळे प्रभु' ही जात झाली. ओसवाल जातीतल्या एका लहान मुलाचा पाय चिमणीच्या अंड्यावर पडला. तेवढ्यावरून माळव्यातील अहिंसानिष्ठ जैन समाजात भांडणे माजली, बहिष्कार पडला आणि निराळी जात निर्माण झाली. हा प्रकार १९३१ साली माळव्यात घडलेला आहे. मागल्या काळी भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, शिवाशिव, अग्रपूजेचे मान, यांवरून किती मारामाऱ्या होत असत आणि जरा खुट्ट होताच ग्रामण्ये, बहिष्कार यांचे सत्र कसे सुरू होत असे याची ज्याला कल्पना आहे त्याला एका जातीच्या कालांतराने शेकडो पोटजाती कशा होत असतील याची सहज कल्पना येईल आणि मग पाश्चात्त्य शास्त्रज्ञांचे आधार घेऊन या एवढ्या जाती-पोटजातींचे समर्थन करणारे आजचे पंडित आपल्या विद्वत्तेचा कसा दुष्ट विक्रय करीत आहेत, हिंदुधर्माचे व हिंदुराष्ट्राचे तेच कसे खरे शत्रु आहेत हे ध्यानात येण्यास उशीर लागणार नाही. परंपरेने आलेले विशेष गुण कायमचे जतन करून ठेवणे व पुढच्या पिढीत तेच संक्रान्त होतील याची काळजी वाहणे या हेतूने अनुवंशाचे शास्त्र पंडितांनी सांगितले आहे. पण त्याअन्वये पाहता हिंदू समाजातील वर्णांचा वा जातींचा अर्थाअर्थी अनुवंशाशी कसलाही संबंध नाही हे सावरकरांनी ठायी ठायी दाखवून दिले आहे. शेकडो वर्षे पिढ्यानुपिढ्या सुतारी, लोहारी, शिवणकाम, वेदपठण करीत आलेल्या घराण्यात व जातीत पुढील संतती त्या त्या कर्मात निपुण होतेच असे नाही. आणि ज्या जातीत एकही पिढी तो व्यवसाय कोणी केला नाही त्या जातीत पिढीजात तो व्यवसाय करणाऱ्यांच्या संततीपेक्षा त्या कर्मात जास्त निपुण असलेले पुरुष उत्पन्न होतात हे मागल्या इतिहासातून